पुणे : पुढारी वृत्तसेवा : बालभारती ते पौड फाटा या रस्त्याच्या कामाला भाजपच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी विरोध केला आहे. यामुळे या रस्त्याच्या कामासंदर्भात भाजपमध्येच मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन आक्षेप नोंदविले आहेत. दरम्यान, कुलकर्णी यांनी भाजप नेत्यांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचाविल्या आहेत.
शहराच्या विकास आराखड्यात बालभारती ते पौड फाटा या रस्त्याचा समावेश आहे. त्यानुसार महापालिकेने नियोजित रस्त्याच्या कामाला गती दिली आहे. मात्र, या रस्त्याला पर्यावरणप्रेमींकडून विरोध होत आहे, तर पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांची मते जाणून घेत हा रस्ता मार्गी लावण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिकेच्या अधिकार्यांनी या ठिकाणी 28 मार्च रोजी पाहणी केली. पर्यावरणवाद्यांच्या सूचनांचा प्रशासनाने स्वीकार केला आहे.
त्यांच्या आणखी सूचना असतील तर मांडाव्यात. सामंजस्याने निर्णय व्हायला हवा. पर्यावरणाचा विचार करून आवश्यक उत्तरेही शोधली पाहिजेत. मात्र, शहरांची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पर्यावरणवाद्यांनी प्रत्येक विकासकामांना खोडा घालू नये, अशी भूमिका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली.
त्यानंतर भाजपच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी सोमवारी आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन नियोजित रस्त्याला विरोध दर्शविला. त्यामुळे भाजपमध्ये मात्र या रस्त्याच्या कामाविषयी मतभेद असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले आहे.
पुण्यातील पर्यावरणाचा र्हास होत आहे. मोजक्या टेकड्या शिल्लक आहेत. नऊशे हेक्टर बीडीपी क्षेत्रातही विनापरवाना बांधकामे आहेत. पुण्यामध्ये मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. मेट्रोच्या प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे. असे असताना बालभारती-पौड फाटा रस्त्याला का प्राधान्य दिले जात आहे? हा रस्ता कसा होणार? या रस्त्याच्या प्रतिकिलोमीटर कामासाठी काही कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे दिली गेली नाहीत.
– प्रा. मेधा कुलकर्णी, माजी आमदार