पुणे

पिंपरी : बाळासाहेबांच्या शिवसेनेवर स्थानिकांचा वरचष्मा

अमृता चौगुले

नंदकुमार सातुर्डेकर :

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. बाळासाहेबांच्या शिवसेनेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. जिल्हा प्रमुखपदी बाळासाहेब वाल्हेकर, शहर प्रमुखपदी नीलेश तरस, युवासेना प्रमुखपदी विश्वजीत बारणे अशा स्थानिक मंडळींचाच कार्यकारिणीत वरचष्मा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेला बाहेरच्यांचा चेहरा बनवण्याची संधी चालून आली आहे. या संधीवर उद्धव सेना स्वार होणार का, याबाबत उत्सुकता आहे. मूळचे काँग्रेसचे असलेल्या बारणे यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपद भूषविले. नंतर शिवसेनेत प्रवेश केलेल्या श्रीरंग बारणे यांनी सन 2009 मध्ये चिंचवड मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली; मात्र लक्ष्मण जगताप यांच्याकडून ते पराभूत झाले.

सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने मावळचे तत्कालीन खासदार गजानन बाबर यांना डावलून बारणे यांना उमेदवारी दिली. बारणे यांनी शेकापच्या तिकिटावर रिंगणात उतरलेल्या आ. लक्ष्मण जगताप यांना पराभूत केले. सन 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांना पराभूत करून बारणे दुसर्‍यांदा निवडून आले. बारणे यांना शिवसेना नेतृत्वाने चांगलेच स्वातंत्र्य दिले. महत्त्वाची संघटनात्मक पदे बारणे समर्थकांकडेच होती. शहरप्रमुख पदावरून राहुल कलाटे यांना हटवून बारणे यांनी आपले समर्थक योगेश बाबर यांना शहरप्रमुख केले. मच्छिंद्र खराडे यांना हटवून जिल्हाप्रमुखपदी गजानन चिंचवडे यांची वर्णी लावली. शहर महिला संघटकपदी उर्मिला काळभोर, युवा सेना अधिकारीपदी आपले पुत्र विश्वजीत बारणे यांची वर्णी लावली.

पुढे शिवसेना शहरप्रमुखपदी अ‍ॅड. सचिन भोसले यांची नियुक्ती झाली. तेव्हा बारणे यांनी आपले समर्थक योगेश बाबर यांची सहसंपर्कप्रमुखपदी वर्णी लावली. मात्र स्थायी समिती सदस्यपदी अश्विनी चिंचवडे यांची वर्णी न लागल्याने गजानन चिंचवडे यांनी भाजपात प्रवेश केला. काही कालावधीनंतर गजानन चिंचवडे यांनी आत्महत्या केल्याने शहरवासीयांना धक्का बसला. राज्यात घडलेल्या राजकीय महानाट्यानंतर आपण उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे बारणे यांनी सांगितले होते; मात्र नंतर ते शिंदे गटात सामील झाले. ऑटो क्लस्टर येथे झालेल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मेळाव्यात त्यांनी शिंदे गटाची कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत स्थानिकांचा वरचष्मा दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पोटापाण्यासाठी शहरात आलेल्या बाहेरच्या मंडळींचा चेहरा ही प्रतिमा पुन्हा निर्माण करता येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बाबर यांना शिवसेनेने लोकसभेला उमेदवारी नाकारली. तेव्हा बाबर यांनी शिवबंधन तोडून मनसेत प्रवेश केला. सीमा सावळे, सारंग कामतेकर, आशा शेंडगे हे त्यांचे समर्थक बाहेर पडले. यातील शेंडगे व सावळे या भाजपच्या तिकिटावर महापालिकेत निवडून आल्या. कामतेकर पराभूत झले; मात्र त्यांनी शहर भाजपचे सरचिटणीसपद भूषविले.

यानंतर शिवसेनेत माजी आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, सह संपर्कप्रमुख योगेश बाबर, जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे, विद्यार्थी सेनेचे माजी शहरप्रमुख रामभाऊ उबाळे, शहरप्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले हे बाहेरच्यांचा चेहरा असलेले नेते सेनेत राहिले. खा. बारणेंशी फारसे जमत नसलेले माजी शहरप्रमुख राहुल कलाटे, त्यांचे समर्थक माजी नगरसेवक अमित गावडे, मीनल यादव तूर्त तरी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहिलेले बारणे समर्थक उर्मिला काळभोर, प्रमोद कुटे हे स्थानिक आहेत. बारणे हे शिंदे गटात गेल्याने शिवसेनेला आता पुन्हा एकदा पोटापाण्यासाठी शहरात आलेल्या मंडळींचा चेहरा होण्याची संधी आहे. या संधीचे शिवसेना सोने करणार का? याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

भाडेकरूंवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी…

मुळातच पिंपरी- चिंचवड शहरात काळभोरनगर येथे शिवसेनेचे रोपटे लावले गेले, तेच भाडेकरू वर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी.! रामगिर गोसावी, मुरलीधर माचुत्रे, बाजीराव लांडे, बाबा धुमाळ, महादेव गव्हाणे, दत्ता गायकवाड, नेताजी चव्हाण, भगवान वाल्हेकर, राहुल कलाटे, योगेश बाबर, अ‍ॅड. सचिन भोसले यांना आजवर शहर प्रमुखपदी संधी मिळाली. यातील गोसावी, माचुत्रे, धुमाळ, चव्हाण, बाबर, भोसले हे शहरप्रमुख बाहेरच्यांचा चेहरा मानले गेले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT