पुणे: राज्य सरकारने सहकार विभागातील विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 गट-अ या लेखापरीक्षण संवर्गातील पदावरून आठ अधिकार्यांना सहनिबंधक (लेखापरीक्षण) गट-अ या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नत्तीने नियुक्तीचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये साखर आयुक्तालयातील सहनिबंधकपदी बाळासाहेब बडाख, तर राज्यस्तरीय लेखा समितीच्या सदस्य सचिव तथा सहनिबंधकपदी (लेखापरीक्षण) डी. एन. काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या विनापद कार्यरत असलेले व्ही. आर. सवडे यांची मुंबई येथील महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड येथे सहनिबंधक पदावर, सहकार आयुक्तालयातील विशेष लेखापरीक्षक एस. के. वुईके यांची रिक्त असलेल्या नागपूर येथील विभागीय सहनिबंधकपदी (लेखापरीक्षण) पदोन्नतीने पदस्थापनेचे आदेश देण्यात आले आहेत.
बीड येथील जिल्हा विशेष लेखापरीक्षक बी. यू. भोसले यांची मुंबई येथे रिक्त असलेल्या सहनिबंधक सहकारी संस्था (लेखापरीक्षण) या पदावर पदोन्नतीचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. ठाणे येथील जिल्हा विशेष लेखापरीक्षक एन. पी. दाणेज यांची मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघावर सहनिबंधकपदी (लेखापरीक्षण) पदोन्नती देण्यात आली आहे.
वसई-विरार महानगरपालिकेत उपायुक्त असलेले विशेष लेखापरीक्षक एस. एस. पुरव यांची महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय बँक मर्यादित येथे सहनिबंधकपदी (लेखापरीक्षण) नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील विशेष लेखापरीक्षक ए. एम. ससाणे यांची मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस महासंघात सहनिबंधक लेखापरीक्षणकाच्या रिक्त पदावर पदोन्नतीने नियुक्तीचे आदेश दिले आहेत.
पुण्यातील विभागीय सहनिबंधक (प्रशासन) कार्यालयातील फिरते पथक विभागाचे विशेष लेखापरीक्षक बी. एस. बडाख यांची साखर आयुक्तालयातील सहनिबंधक (लेखापरीक्षण) या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय पुणे येथील जिल्हा विशेष लेखापरीक्षक डी. एन. काळे यांची पुण्यातील राज्यस्तरीय लेखा समितीच्या रिक्त असलेल्या सदस्य सचिव तथा सहनिबंधकपदी (लेखापरिक्षण) पदोन्नतीने नियुक्ती केली आहे.