Police Pudhari
पुणे

Pune Police Crackdown: बालाजीनगर हल्ल्यानंतर पुण्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त; सर्वसामान्य व्यावसायिकांना फटका

नाकाबंदी, तपासणी आणि रात्रीची कारवाई वाढली; छोटे व्यापारी व हॉटेलचालकांकडून नाराजी, नियमांवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बालाजीनगर परिसरात घडलेल्या खुनी हल्ल्यानंतर पोलिसांनी शहरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. आंदेकर टोळीशी संबंधित हल्ल्यानंतर पोलिसांनी शहरातील विविध भागांत नाकाबंदी, संशयितांची तपासणी, सराईत गुन्हेगारांची झाडाझडती आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या आस्थापनांवर कारवाई सुरू केली आहे. मात्र, या कारवाईचा फटका सर्वसामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक आणि हॉटेलचालकांना बसत असल्याने शहरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आंदेकर टोळीने वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीचा भाऊ अक्षय ऊर्फ बाळा बापू म्हस्के (वय 26, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) याच्यावर बुधवारी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास बालाजीनगर परिसरात हल्ला केला होता. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी सुरू केली आहे. संशयित वाहनांची तपासणी, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची चौकशी आणि शरीराविरुद्ध गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची झाडाझडती करण्यात येत आहे. संवेदनशील भागांत अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, रात्री उशिरापर्यंत पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे.

गुरुवारी स्वतः पोलिस आयुक्त अमितेश कुमार रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेताना दिसले. त्यांनी शहरातील विविध भागांची पाहणी करीत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कठोर खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी रात्री साडेनऊनंतर शहरातील पानटपऱ्या, छोटे हॉटेल, खाद्यपदार्थ विक्री केंद्र आणि इतर आस्थापना बंद करण्यास सुरुवात केली आहे. अनेक भागांत पोलिसांकडून प्रत्यक्ष जाऊन दुकाने आणि हॉटेल्स बंद करण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

यामुळे रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करणाऱ्या लहान व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, ‌‘बार आणि पब रात्री दीड वाजेपर्यंत सुरू राहतात. मात्र, सामान्य दुकानदारांनाच रात्री साडेनऊ वाजता बंद करण्यास भाग पाडले जाते,‌’ असा सवाल नागरिक आणि व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे.

गांधीगिरीने पोलिसांचे स्वागत

या कारवाईदरम्यान काही भागांतील हॉटेल व्यावसायिकांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. दुकाने आणि हॉटेल्स बंद करण्यासाठी आलेल्या पोलिसांचे काही व्यावसायिकांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. दरम्यान, पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे शहरातील नळस्टॉपसारख्या नेहमी गजबजलेल्या भागांमध्ये रात्री लवकर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. “गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी, याला आमचा विरोध नाही. मात्र, सामान्य नागरिक आणि छोट्या व्यावसायिकांना त्रास होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी,” अशी मागणी व्यावसायिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT