Bajaj Pune Grand Tour Pudhari
पुणे

Bajaj Pune Grand Tour: हिंजवडीतून ‘बजाज पुणे ग्रँड टूर-2026’चा शानदार प्रारंभ

91.8 किमीच्या पहिल्या टप्प्याला नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत झेंडा; पिंपरी-चिंचवड ते मुळशी-मावळमध्ये सायकलपटूंची दमदार कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : ‘बजाज पुणे ग्रँड टूर-2026‌’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याला प्रचंड उत्साहात सुरुवात झाली. टी.सी.एस. सर्कल हिंजवडी येथून सुरू झालेल्या या टप्प्याची विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून औपचारिक सुरुवात झाली.

पहिल्या टप्प्यातील एकूण अंतर 91.8 किलोमीटर असून, हा टप्पा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासह मुळशी व मावळ तालुक्यातील घाट-वळण रस्त्यांवरून जाणारा असल्याने सायकलपटूंना वेग, सहनशक्ती आणि तांत्रिक कौशल्याचा कस लागला. निसर्गरम्य परिसरातून मार्गक्रमण करत माण-अंबवडे गाव कमान-पौड-चाले-नांदगाव-कोळवण-हडशी लेक-जावण-तिकोना पेठ-काले-कडधे-थुगाव-शिवणे-डोणे-सावळे चौक-आढळे बुद्रुक-बेबड ओहळ- चंदनवाडी-चांदखेड-कासारसाई-नेरे-मारुंजी-लक्ष्मी चौक-भूमकर चौक-डांगे चौक-श्री संत नामदेव महाराज चौकमार्गे डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट, आकुर्डी येथे या टप्प्याचा समारोप झाला.

स्पर्धामार्गाची पाहणी करून वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा, आरोग्यसेवा तसेच आपत्कालीन सुविधांबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात आले. स्पर्धा सुरू असतानाच घाट-वळणाच्या रस्त्यांवर सायकलपटू वेग आणि क्षमतेचा सुरेख मिलाफ सादर करताना दिसले. काही ठिकाणी तीव वळणे, चढ-उतार व अरुंद रस्ते असल्याने स्पर्धकांसमोर आव्हाने होती. मात्र, आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलपटू आत्मविश्वासाने हे आव्हान पेलताना दिसून आले. स्पर्धेच्या समारोपस्थळी सायकलपटूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

‘सायकल चालवा, आजाराला पळवा‌’चा संदेश

बजाज पुणे ग्रँड टूरअंतर्गत पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली. या स्पर्धेत पुणेकरांनो, जागे व्हा. सायकलचा वापर केल्यास पर्यावरणाचे जतन होईल, प्रदूषणात घट होईल आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. ‌‘सायकल चालवा, आजाराला पळवा,‌’ असा पर्यावरण आणि आरोग्याचा संदेश एका पुणेकराने दिला.

सायकलपटूंचा स्पर्धेदरम्यान अपघात

हिंजवडी येथून पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेला सुरुवात झाली. मुळशी-कोळवण रोडवर एक सायकलपटू घसरल्याने त्यामागून येणाऱ्या सायकलपटूंचा जथ्था एकमेकांवर आदळला. जवळपास 70 सायकलपटू पडल्याची माहिती असून, त्यापैकी 5 ते 6 सायकलपटू किरकोळ जखमी झाले. त्याचबरोबर आकुर्डी येथील स्पर्धा समाप्तीजवळ एका सायकलपटूचा किरकोळ अपघात झाला.

हिंजवडीतून बजाज पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेचा पहिला टप्पा उत्साहात सुरू; घाट-वळण रस्त्यावर नागरिकांची दुतर्फा गर्दी

हिंजवडी परिसरात आयटी क्षेत्रातील युवक-युवतींची लक्षणीय उपस्थिती; अनेक पालक आपल्या लहान मुलांसोबत उपस्थित; चिमुकले सायकलसह

खेळाडूंना प्रोत्साहन देत होते

मोठ्या स्क्रीनवर सुरू असलेल्या थेट प्रक्षेपणासमोर नागरिकांनी अनुभवला थरार; जागतिक मानांकनानुसार रस्त्यांची निर्मिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT