खेड: खेड तालुक्यातील वाडा गावात बैलपोळा सणानिमित्त आयोजित मिरवणूक आणि नृत्यांगनांसह ऑर्केस्ट्रा कार्यक्रमामुळे पुणे ग्रामीण जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग झाल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ च्या कलम ३७(१), (३)/१३५, ३६/१३४ आणि BNSS कलम २२३ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पुणे ग्रामीण जिल्हाधिकाऱ्यांनी दि. १९ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, कोणत्याही सार्वजनिक मिरवणुकीसाठी किंवा कार्यक्रमासाठी परवानगी घेणे बंधनकारक होते. (Latest Pune News)
मात्र, वाडा गावातील दत्त मंदिरापासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत रविवारी (दि. २१) सकाळी ११ च्या सुमारास वाडा येथील धर्मराज बैलगाडा संघटना आणि दहशत किंग गुज्जर बैलगाडा संघटना यांनी परवानगी न घेता बैलपोळा मिरवणूक आणि ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित केला. यामध्ये लाल रंगाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर लाकडी स्टेज बनवून ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यात नृत्यांगना नाचवल्या.
या प्रकरणी फिर्यादी पोलीस फौजदार बाळकृष्ण बुधाजी साबळे यांनी तक्रार दाखल केली आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये जिग्नेश गोपाळे (रा. चिखलगाव), रवी रामदास हुंडारे, सोन्या उल्हास हुंडारे, संकेत माळी, शंकर राजाराम माळी (चौघेही रा. वाडा), योगेश केदारी (रा. सुरकुडी) यांचा समावेश असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी दिली.