कुक्कुटपालन केंद्रांमधील 23 नमुन्यांमध्ये जीवाणू, पाच विषाणू  File Photo
पुणे

कुक्कुटपालन केंद्रांमधील 23 नमुन्यांमध्ये जीवाणू, पाच विषाणू

पशुसंवर्धन विभागातर्फे सिंहगड रस्त्यावरील कुक्कुटपालन केंद्रांमधील 106 नमुने संकलित करण्यात आले होते.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गुलेन बॅरी सिंड्रोम आजाराच्या उगमाचा आणि प्रसाराचा शोध घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे सिंहगड रस्त्यावरील कुक्कुटपालन केंद्रांमधील 106 नमुने संकलित करण्यात आले होते. राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेकडून (एनआयव्ही) या नमुन्यांचा अहवाल पशुसंवर्धन विभाग आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार, 23 नमुने कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी पॉझिटिव्ह आणि 5 नमुने नोरोव्हायरस पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

जीबीएसला कारणीभूत ठरणारा कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू कोंबड्यांमध्येही आढळतो. सर्वाधिक बाधित असलेल्या नांदेड, खडकवासला परिसरात कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणात होते. तेथील कोंबड्यांमध्ये हा जीवाणू आहे का किंवा त्यांच्यापासून पाण्याचे स्रोत दूषित होत आहे का, हे पाहण्यासाठी हे नमुने घेण्यात यावे, असे आरोग्य विभागाने पशुसंवर्धन विभागाला सुचवले होते.

यानुसार कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांच्या गुदद्वारातील, त्यांची विष्ठा व तेथील माती, पाणी यांचे नमुने घेण्यात आले होते. कुक्कुटपालन केंद्रांमधून संकलित करण्यात आलेल्या 29 पाणी नमुन्यांपैकी 26 नमुने कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी निगेटिव्ह आले असून, तीन नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

तपासणीसाठी खडकवासला पाणीसाठ्यापासून 5 ते 6 किलोमीटर परिसरातील 11 केंद्रे तपासण्यात आली होती. केंद्रांमधून उत्सर्जित सांडपाणी नजीकच्या स्रोतात मिसळत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नमुन्यांचा अहवाल

  • तपासणीसाठी पाठवलेले नमुने - 106

  • कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीसाठी तपासलेले नमुने - 66

  • जेजुनी पॉझिटिव्ह नमुने - 23

  • नोरोव्हायरससाठी तपासलेले नमुने - 60

  • नोरोव्हायरस पॉझिटिव्ह नमुने - 5

पशुसंवर्धन विभागाने खडकवासला परिसरातील कुक्कुटपालन केंद्रांची पाहणी केली होती. तेथील नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, याबाबत पशुसंवर्धन विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
- डॉ. निना बोराडे, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका.
दूषित अन्न आणि पाण्यामुळे विविध आजारांचा प्रसार होतो. त्याप्रमाणे कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणूही आजारास कारणीभूत ठरु शकतो. कच्च्या किंवा अर्धवट शिजवलेल्या मांसातून जीवाणूचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी भाज्या आणि मांस स्वच्छ करुन आणि पूर्ण शिजवूनच सेवन करावे. पाणी उकळून प्यावे. गुलेन बॅरी सिंड्रोम हा आजार संसर्गजन्य नसल्याने घाबरुन जाण्याचे कारण नाही.
- डॉ. प्रवीणकुमार देवरे, पशुसंवर्धन आयुक्त.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT