Farmer Loan Waiver
पुणे : प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांचे हे आंदोलन सुरु आहे. दरम्यान, आज प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत पुण्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला. अजित पवार कार्यक्रमात बोलायला उभे राहताच बच्चू कडू यांच्या जोरदार घोषणाबाजी केली. त्यांनी मोठ्याने ओरडत बच्चू कडू यांच्याकडे लक्ष द्या, असे म्हणत आक्रोश केला. दरम्यान, पोलिसांकडून बच्चू कडू समर्थकांना ताब्यात घेण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या वतीने मॉडल स्कूल उद्घाटनाच्या कार्यक्रम गणेश कला क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाषणासाठी उभे राहिल्यानंतर बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावेळी थोडावेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अजित पवार यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पण तरीही ते बाजूला जात नसल्याने पोलिसांनी या कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर काढले.
पुणे मॉडल स्कूल आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शाळेय शिक्षणमंत्री दादा भुसे, विधानपरिषेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार बापूसाहेब पठारे, सुनील शेळके, शरद मांडलेकर, ज्ञानेश्वर कटके, बाबाजी काळे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते.
शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आंदोलनाला बसले आहे. त्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात साठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात गोंधळ घातला. यावेळी त्यांनी मोठ मोठ्याने घोषणा देऊन शेतकरी कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी केली.