पुणे

बाबासाहेबांचे अर्थव्यवस्थेविषयी विचार आजही कालसुसंगत : डॉ. अजित रानडे

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी' या प्रबंधातून रुपयाच्या वाढणार्‍या किंवा कमी होणार्‍या मूल्याचा उद्योजक आणि सामान्यांवर होणारा परिणाम सांगितला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शंभर वर्षांपूर्वी आपल्या अर्थविषयीच्या प्रबंधातून रुपयाबाबत मांडलेले विचार आणि संशोधन आजही कालसुसंगत आहे, असे मत गोखले अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांनी शनिवारी व्यक्त केले. राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी' यावर परिसंवाद झाला. या परिसंवादात डॉ. रानडे बोलत होते. या वेळी 'डिक्की'चे अध्यक्ष मिलिंद कांबळे, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संयोजन समितीचे सदस्य अ‍ॅड. मंदार जोशी आदी उपस्थित होते.

डॉ. रानडे म्हणाले की, याहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थव्यवस्थेबाबतचे विचार, अभ्यास आणि ज्ञानाची आपल्याला माहिती होते. डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि कोलंबिया विद्यापीठातून दोन अर्थव्यवस्थेविषयी प्रबंध सादर केले होते. या प्रबंधांत त्यांनी सोन्याच्या दरांबाबतही भाष्य केले आहे. रिझर्व्ह बँकेकडून मॉनिटरी पॉलिसी जाहीर केली जाते. या पॉलिसीबाबतचे मूळ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रबंधात लपले आहे. त्यामुळे हा प्रबंध रुपयाच्या मूल्याचा विविधांगांनी अभ्यास करण्यासाठी उपयोगी पडतो, असे डॉ. रानडे यांनी सांगितले.

कांबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय उत्तम असे कॉर्पोरेट लॉयर होते. त्यांचे कायदा विषयासोबतच अर्थविषयक ज्ञान हे उच्च होते. या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी यशस्वीपणे काम केले आहे. बाबासाहेब हे प्रागतिक विचाराचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेविषयीचे योगदान अमूल्य आहे.

युवापिढी वाचत नाही, असे म्हटले जाते. मात्र, पुस्तक महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद पाहता वाचनसंस्कृती वाढत आहे, असे स्पष्ट होते. पुणे पुस्तक महोत्सवात साधारण मराठी, इंग्रजीसह इतर भाषांमधील 3 लाख पुस्तके आहेत. या पुस्तकांची खरेदी मोठ्या प्रमाणात युवा पिढीकडून होत आहे. त्यामुळे वाचनसंस्कृतीला हातभार लागत आहे. हे आशादायी चित्र आहे. असाच प्रतिसाद अमळनेर येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मिळेल.
      – रवींद्र शोभणे, नियोजित अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

कोरोनानंतर वाचनसंस्कृती कमी झाली, असे वाटत होते. यापुढे केवळ ऑनलाइन वाचनसंस्कृती राहते की काय? अशी भीती वाटत होती. मात्र, राजेश पांडे यांनी आयोजन केलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद पाहून ही भीती दूर झाली आहे. हा एकप्रकारचा नॉलेज महोत्सव असून, विद्यार्थी व संशोधक यांना संदर्भपुस्तके घेण्यासाठी फायदा होत आहे. असे महोत्सव यापुढेही व्हायला हवेत. त्यासाठी मी सर्वतोपरी मदत करायला तयार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT