पुणे: जिल्ह्यातील 52 लाख लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची ई-कार्ड तयार नाहीत. हे कार्ड काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेऊन 25 दिवसांत ती पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ व ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना’ या दोन्ही योजना राज्यात एकत्रित स्वरूपात राबविण्यात येत आहेत. आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आयुष्मान ई-कार्ड गरजेचे असून, ते मोफत दिले जाते.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे ई-कार्ड बनविण्यासाठी आयुष्मान हे मोर्बाइल अॅप तयार केले आहे. या अॅपच्या माध्यमातून स्वत: लाभार्थी कार्ड काढू शकतात. तसेच, सीएससी केंद्रचालक, ग्रामपंचायत ’आपले सरकार सेवा केंद्र’चालक आणि आशा सेविका हे पात्र लाभार्थी कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आधार ओटीपी किंवा चेहरा ओळखद्वारे (फेस ऑथेंटिकेशन) ई-कार्ड काढून देऊ शकतात.
जिल्ह्यातील राहिलेल्या लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड लवकरात लवकर ई-केवायसी करण्यासाठी जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक गाव तसेच शहरातील वॉर्डमध्ये रास्त भाव दुकानदार, आशा स्वयंसेविका, सीएससी केंद्रचालक यांनी एकत्रित येऊन नियोजन करण्याच्या सूचना डुडी यांनी दिल्या आहेत.
गावातील सर्व आशा स्वयंसेविका व सीएससी केंद्रचालक यांनी रास्त भाव दुकानात दिवसभर उपस्थित राहून आलेल्या सर्व लाभार्थ्यांची मोर्बाइल अॅप्लिकेशनद्वारे ई-केवायसी करावी. सदर ई-केवायसी कार्ड काढण्याची प्रक्रिया 25 दिवसांत पूर्ण करावी.