'ससून'ला अतिरिक्त खाटांच्या मंजुरीची प्रतीक्षा मनुष्यबळ अपुरे; रुग्णसेवा अडचणीत File Photo
पुणे

Sassoon Hospital: 'ससून'ला अतिरिक्त खाटांच्या मंजुरीची प्रतीक्षा मनुष्यबळ अपुरे; रुग्णसेवा अडचणीत

सध्या उपलब्ध असलेल्या मनुष्यबळामध्ये रुग्णसेवा देण्यात अडचणी येत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे: कोरोना काळात ससून रुग्णालयात नवीन अकरा मजली इमारतीत हजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले. नवीन इमारतीत 504 खाटा उपलब्ध आहेत. मात्र, अद्याप वैद्यकीय शिक्षण विभागाची अधिकृत मान्यता मिळालेली नाही. यामुळे या खाटांसाठी आवश्यक मनुष्यबळ व निधी देखील अद्याप मंजूर झालेला नाही. परिणामी, सध्या उपलब्ध असलेल्या मनुष्यबळामध्ये रुग्णसेवा देण्यात अडचणी येत आहेत.

ससून रुग्णालयातील नवीन इमारतीची संकल्पना 2009 साली पुण्यात आलेल्या स्वाइन फ्लूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर समोर आली होती. मात्र, तब्बल 11 वर्षे ही इमारत मंजुरी व बांधकाम प्रक्रियेत अडकून पडली होती. (Latest Pune News)

कोविडच्या काळात गंभीर रुग्णांसाठी तातडीने ही इमारत वापरात आणण्यात आली. तेव्हापासून नवीन इमारतीमध्ये रुग्णसेवा सुरू असूनही, यातील खाटांना अद्याप शिक्षण संचालनालयाकडून मान्यता मिळालेली नाही.

सध्या ससून रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत 1296 खाटा मंजूर आहेत. त्यासाठी मंजूर असलेले मनुष्यबळच जादा 504 खाटांसाठी काम करीत आहे. सध्या मंजूर असलेल्या जुन्या इमारतीतील खाटांप्रमाणेच एकूण मनुष्यबळाच्या केवळ 66 टक्के डॉक्टर आणि कर्मचारी भरलेले आहेत. अकरा मजली इमारतीतील 504 खाटांसाठी मंजुरी मिळावी, यासाठी प्रस्ताव पाठविला आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी दिली.

सध्या रुग्णालयात 1296 खाटांसाठी मंजुरी असून, त्यासाठी 2359 कर्मचार्‍यांची मान्यता आहे. महाविद्यालयासाठी 732 पदांची मंजुरी असून, त्यातील अनेक पदे रिक्त आहेत. या मनुष्यबळाच्या कमतरतेचा थेट फटका रुग्णसेवेला बसत आहे.

रुग्णांना तपासणीसाठी एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत नेतानाही नातेवाइकांनाच धावपळ करावी लागत असल्याचे चित्र आहे. अकरा मजली इमारतीत बालरोग, क्षयरोग, अस्थिरोग आणि रेडिओलॉजीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विभागांचे कामकाज सुरू आहे. शिक्षण संचालनालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर ही फाईल अंतिम मंजुरीसाठी अर्थमंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

2359 मंजूर पदांपैकी केवळ 1565 पदे सध्या भरलेली आहेत आणि 794 पदे रिक्त आहेत. महाविद्यालयातील 732 मंजूर पदांपैकी 424 पदे भरलेली आहेत व 308 पदे रिक्त आहेत. वर्ग 4 च्या पदांसाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली असून, दोन महिन्यांत 350 कर्मचार्‍यांची भरती होईल. वर्ग 1 व 2 पदांसाठी माध्यमातून भरती प्रक्रिया सुरू आहे.
- डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT