भोर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील किल्ल्यांचे वेड केरळच्या अवलियाला लागले असून, मागील 8 महिन्यांत त्याने 6 हजार किलोमीटरचा प्रवास करून 108 किल्ले सर केले आहेत. पुढील वर्षभरात 343 किल्ले सर करण्याचे त्याचे ध्येय्य आहे. दोन दिवसांपासून हमरास एम. के. हा अवलिया भोरमध्ये आला आहे. या वेळी जवाहर तरुण मंडळ चौपाटी, शिलेदार प्रतिष्ठान भोर, रोहिडा शिवजयंती उत्सव भोर व सकल मराठा समाजाच्या वतीने चौपाटी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून नंतर हमरास याचे स्वागत करण्यात आले.
भोर तालुक्यातील रोहिडा, रायरेश्वर, केंजळगड किल्ले हमरास याने सर केले आहेत. 1 मे 2022 पासून केरळावरून निघालेल्या हमरास एम. के. याने सायकलवरून किलोमीटरचा सहा हजार किलोमीटर प्रवास करून महाराष्ट्रातील 108 किल्ले सर केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील 343 किल्ले सर करण्याची जिद्द मनामध्ये ठेवून हमरासचा सायकल प्रवास सुरू आहे.
घनदाट जंगल, कडेकपारीतून वाट काढत किल्ल्यावर जाताना या प्रवासामध्ये आलेले अनुभव सांगताना हमरास म्हणाला, छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व आणी दातृत्व फार मोठे असल्याचा अनुभव संपूर्ण प्रवासात मिळत आहे. प्रवासामध्ये महाराष्ट्रातील अनेक लोक मदत करतात, जेवणासाठीदेखील विचारतात. प्रवासासाठी जिद्द हवी, पैशांची फारशी गरज लागत नाही. महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमी पुढे येऊन मदत करतात. महाराष्ट्राची संस्कृती मला प्रचंड आवडली. येथील लोक आपुलकीने वागतात.
हमरासचे बी. कॉमपर्यंतचे शिक्षण झाले आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड-किल्ल्यांची सफर करण्याचे ठरवून त्यांनी सफरीला सुरुवात केली. प्रवासादरम्यान त्याला त्याच्यासारखे अनेक प्रवासी भेटले. त्यांनी एकमेकांना मदतीचा हातही दिला आहे. काही मोजके किल्ले सोडून महाराजांच्या इतिहासाचा वारसा असलेल्या अनेक किल्ल्यांची पडझड झाली असून, ते किल्ले दुर्लक्षित असल्याची खंत हमरासने व्यक्त केली आहे.
अनेक किल्ल्यांवर दारूच्या बाटल्या, किल्ल्यांच्या भिंतीवर कोरलेली नावे इत्यादींमुळे किल्ल्यांची दुरवस्था झाल्याचे त्याने सांगितले. हमरास एम. के. या अवलियाने राजगड, तोरणा, प्रतापगड, लोहगड, विजापूर, सुधागड, सारसगड, मृगगड, हरिहर, कतरा, माहुली, आशेरी, गंभीर, तांदूळवाडी, कोहोज, रोहिडा, रायरेश्वर, केंजळगड आदींसह 108 किल्ले सर केले आहेत.
छत्रपतींची माहिती केरळमध्ये उपलब्ध करण्यासाठी उपक्रम
सौदी अरेबियामध्ये चालकाची नोकरी करणारा हमरास (वय 26) हा कोटपुराम (केरळ) येथून सायकल प्रवासाला निघाला आहे. या प्रवासात तो एकटाच असून हमरास याचे 30 किलो वजन कमी झाले आहे. तिरंगा अभियान यात्रा व छत्रपती शिवाजी महाराजांची केरळामध्ये अधिक माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने त्याने हा प्रवास सुरू केला आहे.
लहानपणी सायकल चालवण्याची आवड व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याच्या कथांनी मी प्रेरित झालो आहे. तेव्हापासून मी महाराजांचे किल्ले सर करण्याचा ध्यास घेतला. घनदाट डोंगर, कपारी, जंगल, दरी यातून वाट काढत प्रवास करताना क्षणभर भीती निर्माण होते. मात्र, महाराजांनी त्या काळात हे गड, किल्ले कसे तयार केले असतील याचा विचार करून मी पुढच्या प्रवासाला निघतो.
– हमरास एम. के., दुर्गप्रेमी, केरळ.