Aundh Super Specialty Hospital: औंधमध्ये ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ Pudhari
पुणे

Aundh Super Specialty Hospital: औंधमध्ये ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’; महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारणार

आरोग्य विभागाचा 1,527 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे; 400 खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयाची योजना

पुढारी वृत्तसेवा

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : औंध जिल्हा रुग्णालय परिसरात 400 खाटांचे अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी आणि महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दोन्ही रुग्णालये प्रत्येकी 200 खाटांची असणार आहेत. आरोग्य विभागाने याबाबतचा अंतिम प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 1,527 कोटी रुपये इतकी आहे.(Latest Pune News)

औंध जिल्हा रुग्णालयाच्या 35 एकरच्या शासकीय जमिनीवर नव्या रुग्णालयाची इमारत उभी राहणार आहे. रुग्णालयाच्या परिसरात सध्या सुमारे 6,282 चौरस मीटर क्षेत्रावर सहा जुन्या इमारती आहेत. या इमारती पाडून तयार होणारी मोकळी जागा आणि 1,858 चौरस मीटरचे खुले मैदान मिळून सुमारे 8,140 चौरस मीटर क्षेत्रावर नवीन इमारत उभारली जाणार आहे, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्य शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावानुसार, सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी 596, तर महिलांच्या रुग्णालयासाठी 97 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये वर्ग 1 ते वर्ग 4 मधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक पगाराचा खर्च 32 कोटी 31 लाख रुपये येऊ शकेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील नागरिकांना, विशेषत: गरजू रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे नवे रुग्णालय अत्यावश्यक आहे. वाढती लोकसंख्या आणि आरोग्यसेवेची वाढती मागणी लक्षात घेता हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे.
डॉ. भगवान पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे परिमंडल
सुपर स्पेशालिटी रुग्णालय अन्‌‍ महिला रुग्णालयासाठी अंतिम प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. औंध रुग्णालय सध्या पूर्णक्षमतेने कार्यरत आहे. मात्र युरोलॉजी, न्यूरोलॉजी, गायनॅकोलॉजी आणि पेडियाट्रिक्ससारख्या विशेष सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारल्यास पुणेकरांना मोठा दिलासा मिळेल.
डॉ. नागनाथ येमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, औंध जिल्हा रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT