Hospital Pudhari
पुणे

Aundh District Hospital ICU: औंध जिल्हा रुग्णालयातील ५० खाटांच्या आयसीयूवर प्रश्नचिन्ह; कोट्यवधींच्या निधीच्या वापराची चौकशी

कोविडकाळात उभारलेल्या आयसीयूतील उपकरणे, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सुविधांबाबत माहिती अस्पष्ट; सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: औंध जिल्हा रुग्णालयात कोविडकाळात उभारण्यात आलेल्या ५० खाटांच्या अतिदक्षता विभागाच्या (आयसीयू) निर्मितीसाठी व साहित्यासाठी झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक निधीच्या वापरावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश आरोग्यसेवा, पुणे मंडळामार्फत देण्यात आले आहेत.

औंध हे ३०० खाटांचे जिल्हा रुग्णालय असून, सार्वजनिक आरोग्यसेवा नियमांनुसार या रुग्णालयासाठी किमान १२ खाटांचा अतिदक्षता विभाग मंजूर आहे. मात्र, कोविड-१९ महामारीच्या काळात शासनाकडून मिळालेल्या मोठ्या निधीतून येथे ५० खाटांचा आयसीयू उभारण्यात आला होता, असा तक्रार अर्ज शरत शेट्टी यांनी २७ जुलै रोजी दिला आहे.

सध्या प्रत्यक्षात यापैकी केवळ काहीच खाटा कार्यरत असल्याचे दिसून येत असून, उर्वरित सुविधा, उपकरणे, व्हेंटिलेटर, मॉनिटर्स, ऑक्सिजनची व्यवस्था आणि इतर साहित्य नेमके कुठे आहे आणि त्याचा वापर कोण करीत आहे, याची कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. परिणामी, कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक निधीचा योग्य वापर झाला का? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक पुराव्यांसह व स्वतःच्या स्पष्ट अभिप्रायासह अहवाल सात दिवसांच्या आत कार्यालयास सादर करण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक यांना देण्यात आले आहेत. या प्रकरणात दिरंगाई झाल्यास सर्वस्वी जबाबदारी राहील, असा आदेश आरोग्‍यसेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT