कङूस; पुढारी वृत्तसेवा: औदर (ता. खेड) गावच्या घाटरस्त्याच्या धोकादायक वळणावर साइडपट्ट्या अक्षरशः वाहून गेल्या आहेत. परिणामी, रस्ता जीवघेणा बनला आहे. परतीचा पाऊस उघडून एक महिना झाला, तरी रस्त्याकडे ना स्थानिक पुढार्यांचे , ना संबंधित अधिकार्यांचे लक्ष आहे. वाहनचालकांना मात्र वाहन चालवताना रोजचीच मोठी कसरत करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
औदर गावच्या हद्दीत हा सर्वांत मोठा घाट उतार असून, या उताराला जाग्यावरच मोठे धोकादायक वळण आहे. वाहन वळत असताना किंवा वर चढत असताना रस्त्यावरून खाली हमखास उतरत असते. मात्र, रस्त्याच्या कडेच्या संपूर्ण साइडपट्ट्या पावसाने वाहून गेल्या असून, भीषण अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
खेडच्या पश्चिम पट्ट्यात जाण्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. रस्त्यावर देओशी, येणिये, चिखलगाव, कुडे खु., खरपुड, घोटवडी आदी गावांसह शंभरहून अधिक वाड्या-वस्त्या जोडल्या गेल्या आहेत. यामुळे रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते. विद्यार्थी, शेतकरीही याच रस्त्याचा वापर करतात. मात्र, सर्वांचा जीव धोक्यात सापडला असून, साइडपट्ट्या भरण्याची मागणी होत आहे.