समीर सय्यद
पुणे : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत घोटाळे झाल्याचे प्रकार समोर आल्यानंतर शासनाने या कामाच्या अंमलबजावणीमध्ये अनेक सुधारणा केल्या. सार्वजनिक कामांवरील मजुरांची हजेरी (नोंद) नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सॉफ्टवेअर (एनएमएमएस) या मोबाईल अॅपद्वारे घेतली जात आहे. या प्रणालीची सुरुवात पुणे जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली होती. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता राज्यातील सर्व जिल्ह्यांतील मजुरांची हजेरी ऑनलाइन अॅपद्वारे घेतली जात आहे.
रोहयो अंतर्गत ग्रामीण भागात सुमारे 262 प्रकारची कामे केली जातात. त्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक कामांचा समावेश आहे. बेरोजगारांना, मजुरांना कामे देण्यासाठी रोहयोचा उपयोग होतो. मात्र, काही ठिकाणी स्थानिक पातळीवर खोटी कागदपत्रे दाखवून निधी लाटण्याचे प्रकारदेखील घडल्याचे उघडकीस आले. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मजुरांच्या कामाचे वेतन त्याच व्यक्तीच्या हातात देण्यासाठी केंद्र सरकारने एनएमएमएस प्रणाली विकसित केली.
ऑनलाइन हजेरी घेण्यासाठी एनएमएमएस प्रणालीद्वारे मजुरांची उपस्थिती दर्शविली जाते. तत्पूर्वी मजुराने जॉबकार्डचा नंबर अॅपमध्ये संकलित करून त्याचे नाव, पत्ता, कामाचे स्वरूप, कामाचे ठिकाण याची माहिती भरावी लागते. त्यानंतर सकाळी 11 वाजता आणि दुपारी दोन ते पाच या वेळेत मजुराचे छायाचित्र आणि स्वाक्षरीसाठी देण्यात आलेला अंगठ्याचा ठसा एनएमएमएस या अॅपद्वारे घेतला जातो. त्यानुसारच दोन्ही वेळी उपस्थिती असलेल्यांना वेतन दिले जाते.
राज्यातील सर्व जिल्ह्यांत रोजगार हमी योजनेंतर्गत पाच हजार 668 सार्वजनिक कामे सुरू आहेत. या कामांवर 20 हजार 511 मस्टर रोल्स (एका मस्टर रोलमध्ये 5 ते 10 कामगार असतात) आहेत. या कामगारांची हजेरी एनएमएमएस अॅपद्वारे घेतली जात आहे. अमरावती सर्वाधिक, वाशिममध्ये सर्वांत कमी रोजगार हमी अंतर्गत वर्षभरात केल्या जाणार्या कामांचा आराखडा गाव, तालुका आणि जिल्हानिहाय तयार केला जातो. मागणीप्रमाणे कामे केली जातात. राज्यात सर्वाधिक 1098 कामे ही अमरावती जिल्ह्यात सुरू असून, त्याठिकाणी सुमारे पाच हजार मस्टर रोल आहेत. वाशिम जिल्ह्यात केवळ दोन कामे सुरू असून, त्या ठिकाणी केवळ पाच मस्टर रोल आहेत.