पुणे; पुढारी वृत्तसेवा : पोलिसांत तक्रार दिल्याने महिलेच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून महिलेला स्क्रू ड्रायव्हरने भोकसून खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार लुल्लानगर परिसरात घडला. याप्रकरणी काळू सपकाळ (वय-27 डिफेन्स कॉलनी, लुल्लानगर, वानवडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील लुल्लानगर येथील डिफेन्स कॉलनीत राहणार्या 55 वर्षीय आणि 40 वर्षीय अशा दोन बहिणी सात डिसेंबर रोजी रात्री घरात झोपल्या होत्या.
त्यावेळी पूर्वीच्या किरकोळ वादातून त्यांनी सपकाळच्या विरोधात पोलिस ठाण्यात माहिती दिली होती. त्याचा राग मनात धरून सपकाळने बुधवारी रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी यांच्या घराचे दार वाजवून शिवीगाळ करत दरवाजाची कडी तोडून घरात बेकायदा प्रवेश केला. त्यानंतर 'तुम्ही माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करता काय, तुम्हाला दाखवितो' असे म्हणत 40 वर्षीय महिलेचा विनयभंग केला. त्या वेळी 55 वर्षीय महिला मध्ये पडली असता आरोपीने 'तुम्हा दोघीनांही आता जिवंत ठेवणार नाही' असे म्हणत त्यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने स्क्रू ड्रायव्हरसारख्या टोकदार हत्याराने महिलेच्या खुनाचा प्रयत्न केला. पुढील तपास वानवडी पोलिस करत आहेत.