Crime News
पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्यासह दोघांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न File Photo
पुणे

पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्यासह दोघांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुण्यात एका मद्यपी वाहन चालकाने पोलिसांनी पकडले म्हणून महिला पोलीस अधिकाऱ्यासह दोघांना पेट्रोल सदृश ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. महिला सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर आणि पोलीस हवालदार समीर सावंत हे दोघे जखमी झाले आहेत.

याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी संजय फकीरबा साळवे (वय ३२, रा. पिंपरी चिंचवड मुळ जालना ) याच्या विरूद्ध खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी सात वाजता बुधवार पेठ परिसरात घडला आहे. याबाबत पोलीस हवालदार समीर सावंत यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय साळवे हा मद्य प्राशन करून वाहन चालवत असताना वाहतूक पोलिसांना मिळून आला. पोलीस त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत होते. यावेळी त्याने पोलिसांच्या हातातील मशीन हिसकावून घेतले. हा प्रकार समजल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक शैलेजा जानकर तेथे आल्या. वाहतूक पोलिसांनी साळवे याला थांबवून ठेवले होते. काही समजण्याच्या आतच साळवे याने पेट्रोल सदृश्य ज्वलनशील पदार्थ जानकर आणि सावंत यांच्या अंगावर टाकला. त्यानंतर त्याने लाईटरने दोघांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. हा प्रकार घडल्यानंतर साळवे याच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

SCROLL FOR NEXT