पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विविध चौकांमध्ये उभारण्यात आलेल्या 'एटीएमएस' (अॅडप्टिव्ह ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम) मुख्य रस्त्याला जोडणार्या उपरस्त्यांसाठी कुचकामी ठरत आहे. या यंत्रणेमुळे उपरस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागत असून, यंत्रणा उभारण्यापूर्वी उपरस्त्यांचा विचार केला गेला नसल्याचे समोर आले आहे.
शहरात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढल्याने कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून प्रमुख रस्त्यांवरील 125 चौकांमध्ये अत्याधुनिक 'एटीएमएस' बसविण्याचे काम हाती घेतले आहे. सुमारे 102 कोटी 62 लाख रुपयांचे हे काम नवी दिल्लीच्या कंपनीला देण्यात आले. पुढील पाच वर्षे ही यंत्रणा चालविणे व देखभाल-दुरुस्ती करणे, यासाठी प्रतिवर्षी 11 कोटी 58 लाख असा एकूण 57 कोटी 94 लाख रुपये खर्चही येणार आहे.
'एटीएमएस' बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, जवळपास 115 चौकांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र, 'एटीएमएस' बसवल्यानंतर पूर्वी वाहतूक कोंडी होत नसलेल्या रस्त्यांवर व चौकांमध्ये कोंडी होत आहे. ज्या प्रमुख रस्त्यावर (कॉरिडॉर) ही यंत्रणा बसवण्यात आलेली आहे त्या रस्त्याला जोडणार्या उपरस्त्यांवर दररोज सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
यासंदर्भात दै. 'पुढारी'ने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेऊन महापालिका आयुक्तांच्यासमोर 'एटीएमएस' बसविणार्या कंपनीने सादरीकरण केले. या वेळी स्मार्ट सिटीचे वरिष्ठ अधिकारी व पोलिस अधिकारीही उपस्थित होते. यंत्रणेत दिसणार्या त्रुटींबाबत कंपनीच्या प्रतिनिधींना प्रश्न विचारल्यानंतर काही प्रश्नांची उत्तरे त्यांना देता आली नाहीत. यंत्रणा बसवताना केवळ त्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा विचार करण्यात आला आहे. त्या रस्त्याला जोडणार्या उपरस्त्याचा विचार केला गेला नसल्याचे ठेकेदार कंपनीच्या अधिकार्यांनी सांगितले. उपरस्त्यांवर ही यंत्रणा बसवल्यानंतर तेथीलही वाहतुकीचा प्रश्न सुटेल, असेही त्यांनी सांगितले.
शहरातील प्रमुख रस्त्यांवरील 125 चौकांमध्ये 'एटीएमएस' बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना व त्यासाठी शंभर कोटीपेक्षा अधिक रक्कम खर्च केल्यानंतरही वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही. त्यातच आता ही कोंडी सोडवण्यासाठी मुख्य रस्त्यांवर जोडणार्या उपरस्त्यांवरील चौकांमध्येही ही यंत्रणा उभारण्याची मागणी संबंधित ठेकेदार कंपनीने महापालिकेकडे केल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी 'एटीएमएस' शहरातील चौकांमध्ये बसविली जात आहे. जवळपास 75 चौकांमधील यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित असतानाही परिस्थिती जैसे थे असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे या यंत्रणेतील त्रुटींची तातडीने दुरुस्ती करून पुढील 10 दिवसांत याबाबत अहवाल देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केल्या आहेत.