पुणे

नोव्हेंबरअखेर पुणे जिल्ह्यात 47 टक्केच पेरण्या पूर्ण

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  रब्बी हंगामातील पिकांखाली पुणे जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र सुमारे 2 लाख 29 हजार 712 हेक्टरइतके असून, बुधवारअखेर (दि.29) 1 लाख 8 हजार 684 हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या 47 टक्के क्षेत्रावरच पेरणी पूर्ण झालेली आहे. दुष्काळी स्थितीमुळे ज्वारीची 53 टक्के क्षेत्रावरच पेरणी पूर्ण होऊ शकली आहे. तर भातकाढणी पूर्ण झाल्यानंतर हरभरा पेरणीस वेग येत असल्याने पेरणीचे क्षेत्र आणखी वाढण्याची अपेक्षा असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.

जिल्ह्यात रब्बीचे प्रमुख या तालुक्यांमध्ये ज्वारीचा पेरा चांगला आहे. रब्बीत ज्वारी पिकाचे सरासरी क्षेत्र 1 लाख 34 हजार 336 हेक्टर असून, त्यापैकी 71 हजार 736 हेक्टरवर (53 टक्के) पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये बारामतीमध्ये सर्वाधिक 18 हजार 846 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. त्या खालोखाल शिरूर 13 हजार 16, खेड 10 हजार 226, पुरंदर 9 हजार 664, आंबेगाव 6 हजार 179, इंदापूर 4 हजार 143,जुन्नर 3 हजार 45, दौंड 2 हजार 427, भोर 3 हजार 164, हवेली 574, मावळ 301, मुळशी 126, वेल्हे 25 हेक्टरवर ज्वारीची पेरणी पूर्ण झालेली आहे.

रब्बी हंगामातील मुख्य पिकांमध्ये मका पिकाखालील सरासरी क्षेत्र 16 हजार 947 हेक्टर असून, त्यापैकी 16 हजार 161 हेक्टरवर म्हणजे सुमारे 95 टक्के क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झाली आहे. हरभरा पिकाखाली 34 हजार 330 हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी 9 हजार 267 टक्के म्हणजे 27 टक्केच पेरणी पूर्ण झाली आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक असून, गतवर्ष 2022 च्या रब्बी हंगामात सुमारे 71 हजार हेक्टरवरच ज्वारीचा पेरा झाला होता. दुष्काळी स्थितीमुळे त्यापेक्षा कमी क्षेत्रावर पेरणीची अपेक्षा होती. मात्र, ज्वारीला असलेला चांगला दर आणि जनावरांच्या चार्‍यामुळे शेतकर्‍यांनी ज्वारीच्या पेरणीस प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. यापुढे ज्वारीची पेरणी होणार नाही. मात्र, ऊसतोडणी आणि भातकाढणी पूर्ण झालेल्या ठिकाणी गहू आणि हरभर्‍याची पेरणी होणार असल्याने रब्बी हंगामातील सरासरी पेरणी क्षेत्रात आणखी वाढ अपेक्षित आहे.
                                    – संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT