पुणे

हॅलो..अ‍ॅम्ब्युलन्स आहे, पण ड्रायव्हर नाही! ; वायसीएम रुग्णालयातील परिस्थिती

अमृता चौगुले

पिंपरी : हॅलो..! आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरात एक वृद्ध महिला पडल्याने तिला तातडीची वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे आहे. तुम्ही ताबडतोब रुग्णवाहिका पाठवून द्या. आम्ही येथेच थांबलो आहोत. हॅलो..! आज कॉल जास्त आहेत. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी रुग्णवाहिका गेल्या आहेत. आता आमच्याकडे रुग्णवाहिका आहे; मात्र ती चालविण्यासाठी चालकच नाहीत. तुम्ही 112 क्रमांकाशी संपर्क साधा, हा संवाद नागरिक आणि वायसीएम रुग्णालयातील टेलिफोन ऑपरेटरमधील आहे. यावरून वायसीएम रुग्णवाहिका विभागाची सद्यस्थिती दिसून येते.

दरम्यान, अशाच प्रकारचा अनुभव आकुर्डी स्थानक परिसरातील एका नागरिकाला गेल्या आठवड्यात आला. यावरून शहरातील आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा कसे वाजलेत हे दिसून येईल. संपर्क साधल्यानंतर तीन तास उलटून गेले, तरीही कुणी दखल न घेतल्याने मदत करणार्‍या नागरिकाने 112 क्रमांकाशी संपर्क साधल्यानंतर त्या वृद्धेला मदत मिळाली.

पिंपरी-चिंचवड शहराच्या 25 लाख लोकसंख्येसाठी महापालिकेची आठ मोठी रूग्णालये आहेत; मात्र सर्वात मोठे असलेल्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी मोठ्या प्रमाणात रूग्ण येत असतात. साहजिकच तातडीच्या मदतीसाठी रूग्ण अथवा त्यांचे नातेवाईक वायसीएम रूग्णालयाशी संपर्क साधतात; मात्र येथील रुग्णवाहिका संबंधित विभागाशी संपर्क साधला असता, नागरिकांना अथवा रुग्णाच्या नातेवाइकांना रुग्णवाहिकेवर चालक नसल्याचे सांगितले जाते, असे रूग्णाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यामुळे रूग्णांना तातडीने उपचार मिळण्यास अडचणी उद्भवत आहेत.

40 चालकांची आवश्यकता मात्र…

वायसीएममधील रुग्णावाहिकांवर किमान 40 ते 45 चालकांची आवश्यकता आहे. मात्र आता प्रत्यक्षात एकूण 29 चालक आहेत. त्यामुळे प्रत्येक शिफ्टला अपुरे कर्मचारी पडत असल्याची तक्रार या विभागाच्या वतीने होत आहे. त्याबाबत नागरिकांनाही तशाच पद्धतीची उत्तरे दिली जात आहेत. मात्र ही बाब अत्यंत गंभीर आहे. अत्यवस्थ असलेल्या रुग्णाच्या मदतीस या रुग्णवाहिका उपयोगी पडत नसतील, तर नागरिकांनी काय करावे? असा सवाल नागरिक व रुग्णांच्या नातेवाइकांकडून केला जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत आठ मुख्य रुग्णालय आहेत. यामध्ये प्रत्येकी एक रुग्णवाहिका आहे. तसेच प्रत्येकी एक खासगी संस्थेची रुग्णवाहिका आहे. या संस्थेच्या रुग्णवाहिकेसाठी 112 क्रमांकाचा वापर करावा लागतो.

पीएमपीचे चालक परत
कोरोना काळात पीएमपीचे चालक महापालिकेच्या विविध विभागात सेवा देत होते. आत पुन्हा पीएमपीकडून त्यांना बोलावण्यात आल्याचा आदेश आला आहे. त्यानुसार, त्यांना पुन्हा पीएमपीकडे वर्ग करण्यात आले आहे. रुग्णवाहिका विभागातील एकूण 17 चालक पीएमपीला पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आता चालकांची कमतरता जाणवत असल्याचे वायसीएम प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

कोरोना काळात पीएमपीच्या चालकांना महापालिकेच्या विविध विभागात पाठविण्यात आले होते. आता त्या चालकांना परत बोलावण्यात आले आहे. त्यापैकी वायसीएम रुग्णालयात एकूण 17 चालक होते. ते परत गेल्याने चालकांची उणीव भासणार आहे. त्याबाबतचा पत्रव्यवहार प्रशासनासोबत करण्यात आला आहे. लवकरच ही समस्या दूर करण्यात येणार आहे.
              – डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता पदव्युत्तर संस्था, वायसीएम, पिंपरी.

शहराच्या मुख्य रुग्णालयांमधून मदत मिळावी यासाठी रुग्णवाहिका विभागाशी संपर्क केला. मात्र चालक नसल्याचे उत्तर देण्यात आले. त्यानंतर 112 क्रमांकाशी संपर्क साधला. शेवटी तीन तासानंतर त्या वृद्धेला मदत मिळाली.
                                                                     -शैलेष शिंदे, नागरिक. 

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT