पुणे: राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) 2024 च्या कॅलेंडर वर्षात आशिया खंडात सर्वाधिक 268 इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) सादर केलेले आहेत. याद्वारे कंपन्यांनी तब्बल 1 लाख 67 हजार कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे.
मुख्य बाजारातील 90 आणि लघु व मध्यम उद्योग (एसएमई) विभागातील 178 असे 268 कंपन्यांचे आयपीओ बाजारात दाखल झाले. एकाच कॅलेंडर वर्षात सर्वाधिक आयपीओ दाखल होण्याचा यंदा विक्रम झाला आहे. गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारावर विश्वास व्यक्त केला आहे. गत वर्षात जगभरात 1 हजार 145 आयपीओ दाखल झाले आहेत. त्यापूर्वीच्या वर्षात (2023) 1 हजार 271 आयपीओ दाखल झाले होते. जागतिक पातळीवरील आयपीओंची संख्या घटल्याचे दिसून येत आहे.
आयपीओद्वारे भारतातून 1.67 लाख कोटी (19.5 अब्ज डॉलर) जमा झाले. भारतातील सर्वांत मोठा आणि जागतिक स्तरावरील दुसर्या क्रमांकाचा आयपीओ ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचा सादर झाला. ह्युंदाई इंडियाचा आयपीओ तब्बल 3.3 अब्ज डॉलरचा होता.
मुख्य बाजारात 90 कंपन्या सूचिबद्ध झाल्या. त्यातून सुमारे 1.59 लाख कोटी (18.57 अब्ज डॉलर) उभारले गेले, तर 178 एसएमईंनी एकत्रितपणे सुमारे 7 हजार 349 कोटी रुपये (86 कोटी डॉलर) उभारले.
एनएसईचे मुख्य व्यवसाय विकास अधिकारी (सीबीडीओ) श्रीराम कृष्णन म्हणाले, ‘2024च्या कॅलेंडर वर्षातील विक्रमी आयपीओंची संख्या भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिरता आणि क्षमता अधोरेखित करते.
उपलब्ध आकडेवारीनुसार, एनएसईने एकट्याने जपान एक्सचेंज ग्रुप, हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज आणि चीनच्या शांघाय स्टॉक एक्सचेंजच्या एकत्रित संख्येहून अधिक आयपीओ सादर केले आहेत. एनएसईने गत वर्षात आयपीओद्वारे 17.3 अब्ज डॉलरचे भांडवल उभारले. एनवायएसई (15.9 अब्ज डॉलर) आणि शांघाय स्टॉक एक्सचेंज (8.8 अब्ज डॉलर) सारख्या जागतिक स्टॉक एक्सचेंजच्या तुलनेत अधिक आहे.
शेअर बाजार-अर्जसंख्या (कंसात रक्कम अब्ज डॉलर)
राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई), भारत 268 (19.5), जपान एक्सचेंज ग्रुप 93, हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज 66 (10.4), शांघाय स्टॉक एक्सचेंज, चीन 101 (8.8), एनवायएसई (15.9), नॅस्डॅक (16.5).