एमपीएससी मुख्य परीक्षेत महिला प्रवर्गातून आली पहिली
सातार्याचा आतिष मोरे खुल्या प्रवर्गातून राज्यात प्रथम
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 5 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 या परीक्षेतील पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) संवर्गाच्या 374 पदांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत सातारा जिल्ह्यातील आतिष मोरे याने खुल्या प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला असून, बुलडाणा जिल्ह्यातील चेतन राठोड याने मागास प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच, महिला प्रवर्गातून पुणे जिल्ह्यातील अश्विनी केदारी राज्यात प्रथम आली आहे.
उमेदवारांच्या माहितीसाठी परीक्षेचा निकाल, प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवाराचे गुण हे सर्व आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या निकालाच्या आधारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठ्यार्थ नियुक्तीच्या वेळी मूळ प्रमाणपत्रांवरून पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहेत.
उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी, चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीवेळी न केल्यास शासनस्तरावर अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासताना व अन्य कारणांमुळे अपात्र ठरणार्यांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. या परीक्षेचा निकाल न्यायालयात किंवा न्यायाधिकरणामध्ये दाखल करण्यात आलेल्या विविध न्यायिक प्रकरणांमधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे, असे आयोगाकडून कळविण्यात आले.https://www.youtube.com/watch?v=D_0s0ap-6Y0