पुणे : पुण्यातील राजकारणाला वेग आला असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. या गटाचे माजी नगरसेवक अशोक हरणावळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. पुण्यात आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतरीत्या राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली.
आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा ठरत असल्याचे मानले जात आहे. हरणावळ यांच्या सहभागामुळे संबंधित प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पक्षसंघटनेच्या बळकटीकरणावर भर दिला जात असल्याचे चित्र दिसत आहे. या घडामोडींमुळे शिवसेना (उद्धव ठाकरे गट)समोर नवे आव्हान उभे राहिले असून, आगामी निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची चिन्हे आहेत.
अशोक हरणावळ यांच्यासह शरदचंद्र पवार गटाच्या जिल्हा परिषद माजी सभापती पूजा पारगे, नवनाथ पारगे व त्यांचे सहकारी यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील टिंगरे, सुभाष जगताप, कार्याध्यक्ष रूपाली ठोंबरे पाटील आदी उपस्थित होते.