पुढारी ऑनलाईन: कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांच्यात चुरशीची लढत झाली. यामध्ये रविंद्र धंगेकरांचा विजय झाला आहे. रविंद्र धंगेकर यांनी ११ हजार ४० मतांनी विजयी मिळवला. धंगेकर यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. काँग्रेस नेत्यांनी रविंद्र धंगेकरांचं अभिनंदन केलंय. यावर काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कसब्यात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी मिळवलेला विजय हा महाविकास आघाडीची एकजूट आणि नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा विजय आहे. जनमताचा हा कौल स्पष्टपणे भाजपविरोधात आहे. हा जनशक्तीचा धनशक्तीवर झालेला विजय आहे. कसब्याचा निकाल हा महाराष्ट्रातील वातावरण बदलल्याचे संकेत आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. चव्हाण म्हणाले की, काँग्रेस पक्षाने या ठिकाणी लोकप्रिय व सक्षम उमेदवार दिला आणि त्यांच्या विजयासाठी मतदारांनी सत्ता व पैशाची दडपशाही झुगारून लावली.