पुणे : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्यासह विविध संतांच्या पालख्यांसाठी वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील झुंबर हॉल येथे आषाढी पालखी सोहळा-२०२६ च्या नियोजनाबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी विभागीय आयुक्त शितल तेली-उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू आहे. लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेची आणि सुविधांची जबाबदारी प्रशासनाने प्रभावीपणे पार पाडली पाहिजे. पालखी प्रमुखांनी बैठकीत मांडलेल्या अडचणी व सूचनांवर आवश्यक कार्यवाही केली जाईल.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील रस्ते, मुक्कामस्थळे आणि विसावा केंद्रांवर चिखल होणार नाही यासाठी तातडीने दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मार्गावरील अपूर्ण कामे पालखीपूर्वी पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वारकऱ्यांसाठी स्वच्छ शौचालये, शुद्ध पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, मदत केंद्रे आणि दिशादर्शक फलकांची पुरेशी व्यवस्था करण्याबरोबरच महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. निर्मल वारी अभियान प्रभावीपणे राबवून स्वच्छतेवर विशेष भर देण्यास सांगितले.
कचरा व्यवस्थापन, पाणी तपासणी, अन्नभेसळ प्रतिबंध, आरोग्य सेवा आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याबरोबरच चंद्रभागा नदी परिसरात आवश्यक तेथे बचाव पथके आणि नौकांची व्यवस्था करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण पालखी मार्गावर पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त ठेवण्यासह गर्दी व वाहतूक व्यवस्थापन प्रभावीपणे करण्याचे आदेश देण्यात आले.
बैठकीदरम्यान पैठण, मुक्ताईनगर, जळगाव आणि अमरावती परिसरातून येणाऱ्या पालख्यांच्या प्रतिनिधींनी छत्रपती संभाजीनगर विभागातही अशाच प्रकारची नियोजन बैठक घेण्याची मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तत्काळ छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संबंधित संस्थानांच्या अडचणी सोडविण्यासाठी बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या या तत्परतेबद्दल विविध पालखी संस्थानांच्या विश्वस्तांनी समाधान व्यक्त केले.