पुणे

Ashadhi Wari 2023 : सोहळा नियोजनात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही : आमदार दत्तात्रय भरणे यांचा इशारा

अमृता चौगुले

भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा : जगद्गुरू संत तुकाराम महाराज व संत सोपानकाका पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या पालखी सोहळ्याच्या नियोजनामध्ये तसेच वारकर्‍यांना उपलब्ध करून देण्यात येणार्‍या सोयी-सुविधांमध्ये कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिला आहे.
भरणे यांनी सणसर येथील पालखीतळाची पाहणी करून मुक्कामाच्या नियोजनाचा तसेच बेलवाडी येथील रिंगण मैदानाची पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला. या वेळी तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी विजयकुमार परिट, सणसरचे सरपंच पार्थ निंबाळकर, यशवंत पाटील, अभयसिंह निंबाळकर, सागर भोईटे, खरेदी-विक्री संघाचे संचालक अमोल भोईटे, बेलवाडी येथे कांतीलाल
जामदार, अर्जुन देसाई, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, ग्रामपंचायतीचे उपसरपंच नामदेव इथापे व ग्रामस्थ उपस्थित होते.

भरणे म्हणाले, जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी (दि. 19) इंदापूर तालुक्यामध्ये प्रवेश करणार असून, परंपरेप्रमाणे भवानीनगर येथील श्री छत्रपती कारखाना कार्यस्थळावर तालुक्याच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात येणार आहे. सोहळ्याचे इंदापूर तालुक्यामध्ये पाच मुक्काम होणार आहेत. पालखी सोहळ्याच्या नियोजनमध्ये तसूभरही कमतरता भासणार नाही यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने आपण तयारीचा वेळोवेळी आढावा घेत आहोत. प्रशासकीय यंत्रणेचे युध्दपातळीवर काम सुरू असून, तालुक्यामध्ये पालखी सोहळ्याच्या आगमनापासून ते पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करेपर्यंत सर्व व्यवस्था चोख ठेवण्यात येणार आहे. वारकर्‍यांच्या आरोग्याची व स्वच्छतेची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे.

त्यामुळे प्रशासनाच्या वतीने शौचालये, उष्णतेपासून संरक्षणाकरिता तात्पुरता निवारा, पिण्याचे स्वच्छ पाणी, फिरत्या आरोग्य पथकाच्या माध्यमातून आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पाणी, आरोग्य व स्वच्छतेच्या बाबी पुरविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आपण प्राधान्य दिले असून, 3 कूपनलिका व 11 विहिरी अशी एकूण 14 ठिकाणे आपण पाणी भरण्यासाठी निश्चित केलेली आहेत. पालखी मार्गाचे काम चालू असल्याने काही ठिकाणी टँकरने पाणी पोहचविण्यास अडचण होऊ शकते अशा ठिकाणी पाइपद्वारे पाणी पालखी मार्गावर आणले जाणार आहे. यंदा गतवर्षीप्रमाणे 25 ते 30 टँकर मिळण्याची शक्यता असून, पाणी भरण्याच्या ठिकाणी अतिशय शिस्तबध्द पध्दतीने टँकर भरण्यात येणार आहेत. सणसर येथील पालखी सोहळ्याचा तालुक्यातील पहिला मुक्काम असून, त्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला देण्यात आले आहेत. बेलवाडी येथे पालखी सोहळ्याचे पहिले गोल रिंगण पार पडते या ठिकाणी मैदान सुसज्ज करण्यात आले असून, त्याबाबत ग्रामपंचायतीला सूचना देण्यात आलेल्या आहेत.

निर्मल वारीसाठी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाण जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी 1000 फिरत्या शौचालयाचे,संत श्री सोपानकाका पालखीसाठी 200 शौचालयांचे नियोजन करण्यात आलेले आहे. यंदाची वारी 'हरित वारी' म्हणून साजरी करण्यात येणार आहे, त्या दृष्टीने मुक्कामाच्या ठिकाणी एक ते दीड वर्ष वयाची झाडे लावण्यात येणार आहेत. उन्हाची तीव—ता लक्षात घेऊन यावर्षी बारा ठिकाणी निवारा शेड व हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT