पुणे

पुणे : मुंढेंनी पदभार स्वीकारताच आरोग्य प्रशासन लागले कामाला

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: तुकाराम मुंढे त्यांच्या कार्यशैलीसाठी कायमच चर्चेत राहिले आहेत. आरोग्य आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारताच आरोग्य विभागाला 'मुंढे स्टाईल' कामाची झलक शुक्रवारी मध्यरात्री पाहायला मिळाली. मुंढे यांनी वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांना प्राथमिक आरोग्य केंद्रांना 'सरप्राईज व्हिजिट' करण्याच्या सूचना दिल्या. डॉक्टरांची उपस्थिती, रुग्णांना मिळणारे उपचार, रुग्णालयातील स्वच्छता याबाबत आढावा घेण्यासाठी मध्यरात्रीच प्रशासन कामाला लागल्याचे पाहायला मिळाले.
राज्याचे नवनियुक्त आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्याच्या आरोग्य संचालकांकडून सर्व जिल्ह्यांना धडक कारवाईबाबत आदेश देण्यात आले होते.

पुण्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी आळंदी येथील ग्रामीण रुग्णालयाला शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता भेट दिली. त्यावेळी तेथे डॉॅक्टर, स्टाफ नर्स, वॉर्ड मावशी त्याचबरोबर सुरक्षारक्षक उपस्थित असल्याचे आढळले. तेथे 10 महिला व 5 पुरुष रुग्ण दाखल होते व सर्वांची प्रकृती स्थिर होती, असे सांगण्यात आले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी वाघोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्राला, तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनीही वडगाव मावळ येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. डॉक्टरांसह परिचारिका, सुरक्षारक्षक यांची उपस्थिती, त्यांचा गणवेश, रुग्णालयातील स्वच्छता, तातडीच्या रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, रुग्णांना कोणत्याही गैरसोयींचा सामना करावा लागू नये, याबाबतच्या सर्व नियमावलीचे पालन व्हावे आणि कोणत्याही त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई केली जावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. निलंबनाची कोणतीही कारवाई करण्याबाबत आदेश मिळाले नसल्याचे आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT