पुणे : कृषी आयुक्तालयाने कृषी उन्नती योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा-ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम हाती घेतलेला आहे. त्याद्वारे राज्यात उन्हाळी हंगाम सन 2024-25 साठी ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत एकूण 8 हजार 50 क्विंटल प्रमाणित भुईमूग शेंगदाण्याचे बियाणे वितरण लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे. त्यातील आजअखेर 5 हजार 337 क्विंटल बियाणे विक्री पूर्ण झाल्याची माहिती कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर यांनी दिली.
उन्हाळी हंगाम सन 2024-25 मध्ये ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत भुईमूग शेंगदाणा (टी.ए.जी-24 व कादरी लेपाक्षी या वाणांचे) या पिकाकरिता राज्यात कोकण विभाग वगळता इतर विभागांतील 23 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. उन्हाळी हंगाम 2024-25 साठी महाबीजने प्रस्तावित केलेला भुईमूग शेंगदाणा बियाण्यांचा दर प्रतिकिलोस 162 रुपये आहे. त्यामधून देय अनुदान रक्कम 72 रुपये वजा जाता वितरणासाठी शेतकर्यांकरिता अनुदानित दर 90 रुपये प्रतिकिलो निर्धारित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कृषिउन्नती योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा (पूर्वीचे बियाणे व लागवड साहित्य उपअभियान) ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम हा घटक कृषी विभाग, महाबीजमार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकर्यांकरिता महाबीजमार्फत बीजोत्पादन कार्यक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येत असून, पीक फुलोर्यावर असताना प्रशिक्षणवर्गाचे आयोजन करण्यात येते. या प्रशिक्षणात पिकांमधील भेसळ ओळखणे व काढणे, विलगीकरण अंतर, पिकाची काढणी व मळणी, बियाणे साठवणूक इत्यादी बाबींवर मार्गदर्शन केले जाते. या ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्पादित होणार्या बियाण्यांच्या माध्यमातून पुढील वर्षाच्या पेरणीसाठी एक लाख सहाशे पंचवीस क्विंटल अंदाजित बियाणे उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. त्या उपलब्ध होणार्या बियाण्यांतून जवळपास एक लाख हेक्टरइतके क्षेत्र पेरणीखाली येऊ शकेल, असा विश्वासही बोरकर यांनी व्यक्त केला.
निवड केलेल्या लाभार्थी शेतकर्यांना एक एकर क्षेत्र मर्यादेत भुईमूग शेंगदाणा बियाण्यांकरिता जास्तीत जास्त साठ टक्के अनुदानित दराने स्रोत बियाणे पुरवठा करण्यात येत आहे. अनुदानित दराने बियाणे मिळण्यासाठी ऑनलाइन माध्यमातून महाडीबीटी पोर्टलवर शेतकर्यांकडून आलेले अर्ज, तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त अर्जांमधून लॉटरी काढून बियाणे वितरण केले जात आहे. तरीसुद्धा भुईमूग शेंगदाणे बियाणे वितरणाचा लक्ष्यांक शिल्लक राहत असल्यास महाबीजच्या अधिकृत विक्रेत्यांमार्फत शेतकर्यांचा सातबारा उतारा, आधार कार्ड व भ—मणध्वनी क्रमांक इत्यादी घेऊन बियाणे वितरण प्रक्रिया राबविली जात असल्याचे त्यांनी सांगितले.