रेनकोटवरून झालेल्या वादातून एका तरुणाचा भर रस्त्यात चाकूने भोसकून खून करण्यात आला.. File Photo
पुणे

Crime : रेनकोटवरुन झालेला वाद जीवावर बेतला ; तरुणाचा खून

पुढारी वृत्तसेवा

रेनकोटवरून झालेल्या वादातून एका तरुणाचा भर रस्त्यात चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना नर्‍हेेतील झिल कॉलेज चौकात रविवारी (दि.25) रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आदित्य श्रीकृष्ण वाघमारे (वय 23, रा. धारूर, बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश भिलारे नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

दोघेही एका कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. याबाबत सिद्धेश्वर ऊर्फ प्रवीण भारत मोरे (वय 24, रा. वाल्हेकर चौक, नर्‍हे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे ओला कारचालक आहेत. तर मयत आदित्य हा त्यांच्यासोबत रूमवर राहात होता. तो दिवसा डॉमिनोजमध्ये तर रात्री अ‍ॅमेझॉनमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. त्याची आणि आरोपीची दुपारी भांडणे झाली होती. आदित्य याने दुपारी घरी येऊन फिर्यादीला सांगितले की, मला डॉमिनोजमधील मॅडमने रेनकोट दिला होता. तो सुरेशने मला काढायला भाग पाडले. यानंतर आमच्यात वाद झाले तेव्हा तो माझ्या बोटाला चावला. आपण त्याला भेटून वाद मिटवू असे सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादीने सुरेशला रात्री फोन केला.

मात्र सुरेशने फोनवर बोलण्यास नकार देत नर्‍हे येथील हॉटेल मराठा येथे भेटायला बोलावले. यामुळे फिर्याद प्रवीण मोरे, आदित्य, रतन शिंगाडे, सचिन तांगडे असे सर्व रूममेट त्यांच्या कारमधून सुरेशला भेटायला गेले. तेथे सुरेशने आदित्यला उद्देशून शिवी दिल्याने आदित्यने सुरेशच्या कानाखाली मारली. यामुळे सुरेशने त्याच्या पँटच्या खिशातील लपवलेला चाकू काढून आदित्यच्या डाव्या काखेजवळ मारला. यामुळे आदित्य घाबरून झिल कॉलेजच्या दिशेने पळू लागला. त्याच्या मागे सुरेशही पळत गेला. थोड्याच अंतरावर आदित्यला पकडून छातीत चाकू मारला. यामुळे आदित्य रस्त्यावर कोसळला. कारमधून फिर्यादीसह तिघे तेथे पोहचले. तेव्हा आरोपीने चाकू दाखवत त्यांना रोखले. रस्त्याने जाणार्‍या- येणार्‍यांनाही त्याने चाकू दाखवत धमकावले. यानंतर सुरेश तेथून पळून गेला. आदित्यला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.

चार दिवसांत दुसरा खून

सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वीच एका तडीपार सराईत गुन्हेगाराचा हातोड्याने वार करत खून करण्यात आला होता. यानंतर लगेचच ही दुसरी खुनाची घटना घडली आहे. त्यामुळे सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चाललंय काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT