पुणे

पुणे : कृत्रिम झाडे ठेकेदारांनीच उभारली! शहर सजावटीसाठी सीएसआर निधी वापरलाच नसल्याचे उघड

अमृता चौगुले

पुणे : जी-20 परिषदेच्या परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाने शहरात विविध ठिकाणी विद्युत रोषणाई करून रस्ते उजळले. यासाठी जागोजागी शोभेची कृत्रिम झाडेही उभी केली. ही झाडे सामाजिक उत्तरदायित्वाच्या (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी – सीएसआर) माध्यमातून नव्हे तर ठेकेदारांच्या माध्यमातून उभारण्यात आल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे परिषद झाल्यानंतरही शहरातील विद्युत खांबांना रंग देणे व तिरंगी विद्युत रोषणाई सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.

शहरात 16 आणि 17 जानेवारी रोजी जी 20 परिषदेंतर्गत विविध देशांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी शहरातील रस्ते, पदपथ, रस्त्याकडेच्या भिंती, दुभाजक, उड्डाणपुलांच्या भिंती रंगवून चकाचक करण्यात आल्या होत्या. यामध्ये सीएसआरच्या माध्यमातून शहरातील 54 हून अधिक प्रमुख चौकांचे आणि आयलँडचे सुशोभीकरण करण्यात आले. तर महापालिकेच्या विद्युत विभागाने पथदिव्यांच्या खांबांना रंगरंगोटी व तिरंगी विद्युत रोषणाई केली.

दरम्यान, ही कृत्रिम झाडे व विद्युत रोषणाई सीएसआरच्या माध्यमातून करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, ही झाडे ठेकेदारांच्या माध्यमातून उभारण्यात आल्याचे समोर आले आहे. या कृत्रिम झाडांचा खर्च कोणी केला? याबाबत विद्युत विभागाच्या अधिकार्‍यांकडून माहिती घेतल्यानंतर परस्परविरोधी उत्तरे मिळत आहेत.

अधिकार्‍यांमध्ये नाही एकवाक्यता
यासंदर्भात विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल म्हणाले की, सी. एस. आर.च्या माध्यमातून चार दिवसांसाठी ही कृत्रिम झाडे घेण्यात आली होती. एका झाडासाठी प्रत्येक दिवसासाठी 5 हजार रुपये खर्च झाला आहे. सीएसआरसाठी करण्यात आलेल्या पत्रव्यवहाराबाबत विचारले असता, कंदुल यांनी 'माहिती घेऊन सांगतो,' असे स्पष्टीकरण दिले. तर विद्युत विभागाच्या एका कार्यकारी अभियंत्याने या झाडांचा खर्च महापालिकेच्या मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातील ठेकेदारांनी केल्याचे सांगितले. एकाच विभागातील दोन अधिकार्‍यांमध्ये या झाडांवरून एकवाक्यता नसल्याचे समोर आले आहे.

परिषदेनंतर विद्युत रोषणाई व रंगकाम
जी-20 परिषदेसाठी विद्युत विभागाने पथदिव्यांना तिरंगी विद्युत रोषणाई आणि खांबांना निळा – पांढरा व निळा रंग देण्याचेही काम केले. मात्र, अनेक ठिकाणी निम्माच खांब रंगविण्यात आल्याचे चित्र परिषदेनंतर सारसबाग परिसरात व इतर ठिकाणी पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, जी-20 परिषद संपल्यानंतर तीन दिवसांनी शहरात विविध ठिकाणी पथदिव्यांना विद्युत रोषणाई व रंग देण्याचे काम सुरूच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT