Artificial Milk Adulteration | डिटर्जंट, शॅम्पू, पामतेलाचा वापर करून कृत्रिम दुधाची निर्मिती Pudhari
पुणे

Artificial Milk Adulteration | डिटर्जंट, शॅम्पू, पामतेलाचा वापर करून कृत्रिम दुधाची निर्मिती

मंचर येथे एफडीएच्या छाप्‍यात धक्‍कादायक प्रकार उघडकीस; सुशांत हिंगे, संदीप लोढा मुख्य सूत्रधार!

पुढारी वृत्तसेवा

मंचर : अन्‍न व औषध प्रशासन आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्यातील कृत्रिम दूध भेसळीच्या संघटित जाळ्यावर धडक कारवाई केली. यात पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे या पाच जिल्ह्यांत एकाच वेळी संयुक्त छापे टाकले. तपासादरम्यान स्किम्ड मिल्क पावडर, व्हे पावडर, इमल्सिफायर, डिटर्जंट, शॅम्पू आणि पामतेल यांचा वापर करून कृत्रिम दूध तयार करून ते नैसर्गिक दुधात मिसळून विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या कारवाईत सुमारे १.४८ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, २० हजार लिटर संशयित दूध जागीच नष्ट करण्यात आले. ४९ नमुने तपासणीसाठी संकलित केले असून पाच अन्य परवाने निलंबित आणि चार व्यवसाय बंद केले आहेत. मंचर (ता. आंबेगाव) येथील दूध भेसळ प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सुशांत हिंगे (मंचर), तर संदीप लोढा हा सल्लागार म्हणून कार्यरत असल्याचे तपासात निष्पन्‍न झाले आहे. याबाबत प्रशासनाच्या वतीने मंगळवारी माहिती देण्यात आली. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता, २०२३ तसेच अन्‍नसुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत २६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

संयुक्त छाप्‍यादरम्यान विविध दूध संकलन केंद्रे, चिलिंग सेंटर्स, भेसळ द्रव्यांचे साठे, पॅकिंग केंद्रे तसेच कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली. या तपासात कृत्रिम दूधनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे विविध पदार्थ, उपकरणे, कागदपत्रे, व्यवहाराची नोंद, पुरवठा साखळीशी संबंधित माहिती तसेच वैज्ञानिक पुरावे हस्तगत करण्यात आले. आणखी बनावट दूध रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचे दिसून येत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

दूध व्यावसायिकांसाठी नवे आदेश

दुधामध्ये युरिया, डिटर्जेंट, कॉस्टिक सोडा यांसारख्या रसायनांची भेसळ आढळल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने कठोर पावले उचलली आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दूध व्यावसायिकांसाठी नवे आदेश जारी करताना ग्राहकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

एफडीए प्रशासनाने नोंदवलेल्या गंभीर अनियमितता

  • दूधात पाण्याची भेसळ व कृत्रिम दूध विक्री

  • युरिया, डिटर्जेंट, कॉस्टिक सोडा, स्टार्च, ग्लुकोज, मेलामाइन यांचा वापर

  • एसएनएफ व मिल्क फॅट मानकांचे उल्लंघन

  • ॲफ्लाटॉक्सीन एम१ व अँटिबायोटिक रेसिड्युस आढळणे

  • शीतसाखळीचे पालन न करणे

  • विनापरवाना व्यवसाय व चुकीचे लेबलिंग करणे

दूध खरेदी करताना नागरिकांनी काय करावे?

सीलबंद पॅक तपासा लेबल वाचा एफएसएसएआय परवाना नंबर तपासा उत्पादन दिनांक तपासा बेस्ट बिफोर तपासा संशयास्पद दूध खरेदी करू नका कच्चे दूध उकळूनच वापरा संशय असल्यास तक्रार करा सुरक्षित पॅकेजिंग घरगुती पातळीवर साध्या चाचण्या करून पाणी, स्टार्च किंवा साबणासारखा वास आहे का ते तपासता येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT