पुणे

मांजरी : कवडीपाट येथे परदेशी पक्ष्यांचे आगमन; पर्यटकांच्या गर्दीत वाढ

अमृता चौगुले

मांजरी; पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर रोडवरील कवडीपाट येथे उत्तरेकडील स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणी चक्रवाक, भिवई, थापट्या या बदकांखेरीज दलदल ससाणा, तुतवार, पिवळा धोबी, पांढरा धोबी, राखी धोबी, पाणलावा, रफ, रक्तसुरमा, गॉडविट, नामा, शेकाट्या, नदीसूरय, यांसारखे स्थलांतरित पक्षी दाखल होत आहेत.

त्याचबरोबर राखी बदक, चित्रबलाक, राखी बगळा, मोरबगळा, मध्यम बगळा, छोटा बगळा, वंचक, जांभळा बगळा, पांढरा शराटी, काळा शराटी, ताम्र शराटी, चमचा, रातबगळा, कंठेरी चिखल्या इत्यादी स्थलांतरित व स्थानिक स्थलांतरित पक्षी शेकडोंच्या संख्येने पाणवठ्यावर विहार करताना दिसत आहेत. त्यांना पाहण्यासाठी पक्षिप्रेमींची गर्दी दिसून येत आहे.

हिवाळ्यात उत्तर गोलार्धात बर्फवृष्टी झाल्याने जलाशय, नद्या, तळी गोठतात, जमीन बर्?ाच्छादित होऊन वनस्पती, किडे-कीटकांचा अभाव निर्माण झाल्याने अन्नाचे दुर्भिक्ष निर्माण होते. शिवाय, रात्र मोठी व दिवस लहान असल्याने अन्न मिळविण्यासाठी पक्ष्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे या प्रदेशातील पक्ष्यांना अन्न मिळविणे व थंडीपासून संरक्षण करणे, यासाठी दक्षिणेकडे स्थलांतर करावे लागते. या काळात उत्तरेकडील करकोचे, नाना प्रकारची वन्य बदके, शिकारी पक्षी, छोटे कीटकभक्ष्यी वटवटे, यांसारखे पक्षी हजारोंच्या संख्येने दक्षिणेकडे झेपावतात. हे पक्षी हजारो किलोमीटर प्रवास करून आपल्याकडे येतात.

'स्थलांतराच्या या प्रवासात पक्षी ग्रह, नक्षत्रांचा मागोवा घेत मार्गक्रमण करतात. पक्ष्यांचा हा प्रवास दिवसा सूर्य व रात्री नक्षत्रांच्या मदतीने होत असतो, तसेच पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र, वायुलहरी, उंच पर्वत, मोठे जलाशय, सरोवरे यांचाही पक्ष्यांना मार्गदर्शक खुणा म्हणून उपयोग होतो,' अशी माहिती 'निसर्गयात्री' या पर्यावरणप्रेमी संस्थेचे संचालक पक्षी अभ्यासक विशाल तोरडे यांनी दिली.

पुणे-सोलापूर रोडवरील कवडी हे पुणे आणि परिसरातील पक्षिप्रेमींचे आवडते पक्षिनिरीक्षण केंद्र आहे. या ठिकाणी वर्षभर सुमारे 200 पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी आढळून येतात. त्यांना पाहण्यासाठी पुणे शहर आणि परिसरातील पक्षिप्रेमी मोठ्या संख्येने कवडी येथे हजेरी लावतात. वाढते प्रदूषण, हवामानबदल व मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांच्या अधिवासातील बदल याचे पक्षिजीवनावर अनेक दुष्परिणाम होताना दिसून येत आहेत, तसेच त्यांना अन्न मिळविण्यासाठी अडथळे येत आहेत. त्यामुळे वन विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पक्षिप्रेमींकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT