पुणे; पुढारी वृत्तसेवा : नामांकित जीवन विमा कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करून, पन्नास लाखांचा विमा काढल्यानंतर शून्य टक्के व्याजदराने पन्नास लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने नागरिकांना आर्थिक गंडा घालणार्या बनावट कॉलसेंटरचा दत्तवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुंबईतील मुलुंड परिसरात हे कॉल सेंटर सुरू होते.
याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, तेथे काम करणार्या इतर मुला-मुलींना चौकशीसाठी दत्तवाडी पोलिस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. रोहित संतोष पांडे (वय 24,रा.किसन नगर नं.1 वागळे इस्टेट, ठाणे), दानेश रविंद्र बि—द (वय 25,रा.अंबरनाथ पश्चिम) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तेथून पोलिसांनी कॉल करण्यासाठी वापरण्यात येणारे चाळीस मोबाईल, संगणकाच्या हार्डडिस्क, एक एनव्हीआर, व काही कागदपत्रे जप्त केली आहेत.
पुणे शहरातील एका व्यक्तीची अशाप्रकारे फसवणूक झाल्याचा गुन्हा दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाखल होता. पन्नास लाखाचा विमा काढल्यानंतर त्याच्यावर पन्नास लाखाचे कर्ज बिनव्याजी मिळवून देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली होती. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने दत्तवाडी पोलिस ठाण्याचे सायबर पथक तपास करत होते. त्यांनी आरोपी वापरत असलेला मोबाईल क्रमांक, कंपनीचे डोमेन नेम व इतर माहिती तांत्रिक विश्लेषणाद्वारे प्राप्त झाली.
त्यावेळी फसवणूक करणारे कॉलसेंटर हे मुंबईत मुलुंड येथे असल्याचे समजले. दत्तवाडी पोलिसांच्या सायबर पथकाने या कॉलसेंटरवर छापा टाकला. त्यावेळी 43 मुले, मुली, ऑफसमध्ये बसून कॉल करताना दिसून आले. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे उपनिरीक्षक अक्षय सरवदे, कर्मचारी काशिनाथ कोळेकर, जगदिश खेडकर, अनुप पंडीत यांनी केली.
अशी होत होती फसवणूक
विविध शहरातील नागरिकांना फोन कॉलद्वारे नामांकित विमा कंपनीतून बोलत असल्याचे सांगून विम्यावर लोन मिळवून देण्याच्या बहाण्याने फोन करत होते.नंतर आधारकार्ड, कॅन्सल चेक, फोटो व्हॉट्स्अपवरती घेऊन लोनच्या सहा महिन्यांचे प्रिमियम अडीच लाख रुपये होत असल्याचे सांगत. त्यापैकी सव्वा लाख रुपये लोन प्रिमियम म्हणून भरण्यास सांगून फसवणूक करत होते.
विमा पॉलिसी काढल्यानंतर बिनव्याजी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याचा गुन्हा दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाखल होता. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना मुंबई मुलुंड येथील बनावट कॉलसेंटरची माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करून दोघांना अटक केली आहे
अभय महाजन,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दत्तवाडी