पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : हातभट्टी व्यवसायातील दोन अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 16 लाख 91 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विभागाने दत्तनगर, डुडूळगाव येथे ही कारवाई केली.
गणेश जीवन मनावत (25, रा. गणेशनगर, निघोजे, खेड), मोहनलाल रत्नलाल देवासी (42, रा. पद्मावती रोड, आळंदी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, त्यांचा एक साथीदार विनोद प्रजापती (25, रा. दत्तनगर, डुडूळगाव) हा फरार झाला आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हातभट्टीच्या व्यवसायातील अट्टल गुन्हेगार आहेत.
दरम्यान, अमली पदार्थ विरोधी पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकातील पोलिस कर्मचारी संदीप पाटील आणि सदानंद रुद्राक्षे यांना माहिती मिळाली, की आरोपी हातभट्टी बनवण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन जाणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी छापा करूम आरोपींच्या वाहनांची झडती घेतली.
त्यावेळी पोलिसांना वाहनांमध्ये हातभट्टी बनवण्यासाठी लागणारी प्लास्टिकची कॅन, गुळाच्या ढेपी, नवसागरची पोती असे एकूण 16 लाख 91 हजार 400 रुपयांचे साहित्य मिळून आले.
ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश पवार, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत महाले, पोलिस कर्मचारी बाळासाहेब सूर्यवंशी, प्रदीप शेलार, राजेंद्र बांबळे, संदीप पाटील, सदानंद रुद्राक्षे, अशोक गारगोटे, संतोष भालेराव, मनोज राठोड, दादा धस, मयूर वाडकर, प्रसाद कलाटे, विजय दौंडकर, अनिता यादव यांच्या पथकाने केली.
अमली पदार्थ विभागाने मुसक्या आवळलेले दोन्ही आरोपी हे दारू विक्रीच्या व्यवसायातील अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वी अवैध दारू विक्रीप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
मात्र, तरीही त्यांची खोड जात नसल्याचे या कारवाईतून अधोरेखित होत आहे. आरोपी गणेश याच्यावर यापूर्वीचे 12 गुन्हे आणि आरोपी मोहनलाल याच्यावर 6 गुन्हे दाखल असल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे.