पुणे

दाभोलकरांच्या मोकाट मारेकर्‍यांना अटक करा ; अविनाश पाटील यांची मागणी

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  खुनाला दहा वर्षे होऊनही डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी मोकाट असून, त्यांच्यावर कारवाई होत नाही. मात्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दहा वर्षे सतत केलेल्या आंदोलन उपक्रमामुळे दाभोलकरांच्या मारेकर्‍यांची विचारधारा, संघटना आणि त्यांचे पाठीराखे कोण आहेत, याची जाणीव सर्व जगाला झाली आहे. दाभोलकरांच्या मारेकर्‍यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना अटक करून कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यात विवेक निर्धार मेळावा झाला. या वेळी अविनाश पाटील बोलत होते. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ. राम पुनियानी, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, रझिया पटेल, महा.अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बागवे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाटील म्हणाले, 'इतिहासात राजा किंवा नेता मारला गेला की राज्य, पक्ष किंवा संघटना संपून जाते. परंतु, महा. अंनिसच्या बाबतीत तसे घडले नाही. डॉ. दाभोलकरांच्या खुनाला दहा वर्षे होऊनही संघटनेचे काम थांबले नाही. संघटना ताकदीने उभी राहिली.' डॉ. पुनियानी म्हणाले, 'कुठलाही धर्म धोक्यात नसतो, धोक्यात असते ती काही लोकांची सत्ता. ज्याला ते धर्माच्या आधारे मिळवतात. स्वातंत्र्यलढ्यात फुले, गांधी, नेहरू, आंबेडकरांनी वैज्ञानिक दृष्टी असलेली समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मूल्ये आपणाला दिली. याच्या विरोधात दुसर्‍या बाजूला धर्म, द्वेष आणि विषमतेवर आधारित मूल्यांचा प्रसार करण्यात आला. डॉ. दाभोलकरांचा खून देखील अशी मूल्ये जपणार्‍या विचारसरणीतून करण्यात आला आहे.' कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय बनसोडे यांनी केले. विशाल विमल यांनी सूत्रसंचालन केले.

देशात धर्म आणि राजकारण यांची युती…
देशात धर्म आणि राजकारण यांची युती झाली आहे. यातून धर्मवादास पाठबळ दिले जात आहे. सरकारे केवळ सण साजरे करण्यासाठी स्थापना झाली आहेत का? सत्य आणि अहिंसा ही कचर्‍यात टाकलेली मूल्ये बनली आहेत. ती रुजविण्यासाठी शंभर दाभोलकरांची गरज असल्याचे हेमंत देसाई यांनी म्हटले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT