आळंदी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : संत.ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देवस्थानची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. नदीपलीकडे सुमारे पाच हजार भाविक क्षमतेच्या दर्शनबारीचे काम सुरू झाले आहे. नदीपलीकडे गतवर्षीपेक्षा यंदा कमी जागा उपलब्ध झाली आहे. गेल्या वर्षी 100 फूट द्ब 150 फूट अशी दर्शनबारी उभारण्यात आली होती. यंदा या जागेत दुसरा कार्यक्रम होणार असल्याचे कारण देत कमी जागा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे यंदा 150 फूट द्ब 60 फूट अशी दर्शनबारी होणार आहे.
सुमारे चार हजार स्क्वेअर फूट जागा कमी उपलब्ध झाली आहे. परिणामी, पाच हजारऐवजी यंदा दोन हजार भाविकच रांगेत उभे राहू शकणार आहेत, यामुळे भाविकांची संख्या वाढल्यास ही रांग रस्त्याने वाय जंक्शन येथील एसटी स्टॅण्डपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांना उघड्या रांगेत पावसाचा किंवा उन्हाचा त्रास होणार आहे.
घातपात, चेंगराचेंगरीसारख्या घटना घडू नये, यासाठी देऊळवाड्यात दर्शनासाठी आलेल्या वारकर्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, धातूशोधक यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. तात्पुरती दर्शनबारी उभारण्याचे काम सुरू आहे. देवस्थानची सध्या चार हजार क्षमतेची दुमजली दर्शनबारी इमारत असून, भाविकांची संख्या लक्षात घेता, ही क्षमता नदीपलीकडे तात्पुरती दर्शनबारी उभारून वाढवण्यात येणार आहे. किमान दहा हजार भाविक एकत्र येत दर्शन घेऊ शकतील इतकी ही क्षमता वाढविण्यात आली आहे.