पुणे : भुकूममध्ये वास्तव्यास असताना कर्वेनगर आणि कोथरूडमधील मोकाटेनगरमध्ये राहत असल्याचे दोन वेगवेगळे खोटे रहिवासी पुरावे देऊन शस्त्र परवाना मिळविणार्या वैष्णवी हगवणे यांचा पती शशांक आणि दीर सुशील हगवणे यांच्याविरोधात वारजे आणि कोथरूड पोलिस ठाण्यांत फसवणुकीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. (pune News Update)
वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू झाल्यानंतर हगवणे बंधूंविरोधात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. याबाबत कोथरूड आणि वारजे पोलिस ठाण्यांतील पोलिसांनी फिर्याद दिली आहे. हगवणे बंधूंनी शस्त्र परवाने मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेत खोटी माहिती दिली होती. खोट्या माहितीच्या आधारे यांनी शस्त्र परवाना मिळविला होता. शस्त्र परवाना मिळविताना दोघांनी दिलेल्या माहितीत विसंगती असल्याचे चौकशीत उघड झाले. या माहितीची शहानिशा करण्यात आली. कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
शशांक हगवणे याने आपण कर्वेनगरमधील सरगम कॉलनीतील बिल्डिंग नं. 4 मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 203 येथे गेल्या 10 वर्षांपासून राहत असल्याचा खोटा पुरावा दिला होता, तर सुशील हगवणे याने आपण कोथरूडमधील पौड रोडवरील मोकाटेनगरमध्ये गेली 10 वर्षे राहत असल्याचा खोटा पुरावा शस्त्र परवाना मिळविण्यासाठी दिला होता.
पती शशांक, दीर सुशील तसेच नीलेश चव्हाण यांनी 2022 मध्ये पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाने मिळविले होते. तिघांची पिस्तुले जप्त केली असून, त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शशांक आणि सुशील हगवणे यांनी पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळविण्यासाठी पुण्यातील निवासाचा पत्ता दिला. या दोघांनी वारजे आणि कोथरूड पोलिस ठाण्यात शस्त्र परवाना मिळविण्यासाठी अर्ज केले होते. वास्तव्याचा पुरावा म्हणून दोघांनी भाडेकरार शस्त्र परवान्यासाठी पोलिसांना दिले. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल केल्याची माहिती परिमंडल-3 चे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.