पुणे

पुणे : पिंपरखेड येथे हत्यारांचा धाक दाखवत चोरी

अमृता चौगुले

पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा : 

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड (पंचतळे) येथे संतोष कारभारी जाधव यांच्या घरावर गुरुवारी (दि. १९) मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास हत्याराचा धाक दाखवत दरोडा पडला. यामध्ये दरोडेखोरांनी सुमारे आठ तोळे सोने, मोबाईल, एक घड्याळ व १५ हजार रूपये रोख असा एकूण ३ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत रेश्मा संतोष जाधव यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरखेड (ता. शिरूर) हद्दीतील पंचतळे नजीक संतोष जाधव हे आपले आई-वडील, पत्नी व मुलासह वास्तव्यास आहेत. गुरुवारी (दि. १९) फिर्यादी रेश्मा यांच्या सासू, सासरे हे दशक्रियेनिमित्त बाहेरगावी गेले होते. मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास अंगात निळसर जर्किंग, जीन्स पॅन्ट, काळ्या रंगाचे स्पोर्ट्स शूज, तोंडाला व डोक्याला मफलर असा पेहराव असणाऱ्या चार अज्ञात इसमांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी तुमच्याकडे असलेले सर्व पैसे द्या, कपाटाच्या चाव्या कुठेत अशा प्रकारे धमकी देत हातातील विळ्यासारख्या दिसणाऱ्या हत्याराचा धाक दाखवत अंगावरील सर्व दागिने काढून देण्यास सांगितले.

घाबरलेल्या अवस्थेतील रेश्मा यांनी आपल्या अंगावरील सर्व दागिने काढून दिले. तसेच चोरट्यांनी आपल्या हातातील कटावणीच्या साह्याने कपाटाचे लॉकर तोडून इतर काही दागिने जबरीने काढून घेतले. यामध्ये गळ्यातील व कानातील गळसर, सोन्याचा नेकलेस, मंगळसूत्र, कानातील रिंग हे सोन्याचे दागिने, मोबाईल, एक घड्याळ, मुलाचा गल्ला, १५ हजार रूपये रोख असा एकूण ३ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेत दुसऱ्या खोलीत ठेवलेल्या लोखंडाची पेटीसह इतर साहित्याची उचकापाचक करून घराजवळील शेतात पेटीतील साहित्य फेकून दिले. तसेच घराला बाहेरून कडी लावून जाधव कुटुंबियांना घरामध्ये कोंडून घेऊन मोबाईल चोरून नेल्याने शेजारी इतरत्र कोणाशीही संपर्क करता आला नाही. यावेळी चोरट्यांनी गोठ्यात बांधलेल्या शेळीचे दावे कापून एक शेळी देखील नेली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले, अमोल आगलावे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

दरम्यान घटनास्थळाला शिरूरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहायक फौजदार तुषार पंधारे, पोलिस हवालदार जनार्दन शेळके यांनी भेट दिली आहे. या घटनेतील जबरी चोरी करणाऱ्या इसमांची ओळख पटण्यासाठी बोटांचे ठसे निर्देशित करणारे पथकाला पाचारण करण्यात येणार असून नजीकच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली आहे.

 मध्यावधी ठिकाण असल्याने पोलिस चौकी व्हावी

या भागात दरवर्षी अनेक छोट्या मोठ्या चोरीच्या घटना घडत आहेत. बेल्हा-जेजुरी राज्यमार्गावरील पंचतळे हे मध्यावधी ठिकाण असून अनेक रस्ते एकत्र येत असल्याने गुन्हेगारांचा शोध घेणे अवघड होत आहे. यामुळे रात्रीच्या वेळी ग्रामसुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करून गस्त घालणे गरजेचे आहे. तसेच पंचतळे ठिकाणी पोलिस चौकी व्हावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT