पुणे

आम्ही देशाचे खरंच नागरिक आहोत का? गझलकार वैराळकरांचा सवाल

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

'आम्हा तमाशा कलावंतांची अन्न, वस्त्र, निवारा याची जबाबदारी घेऊ शकेल, असे राज्य नाही. तमाशा कलावंतांच्या नशिबी लोकशाही नाहीच. कारण आजही कलावंतांना मूलभूत गरजांसाठी झगडावे लागते. आम्हाला मतदान करण्याचा हक्क नाही, खरंच आम्ही देशाचे नागरिक आहोत का?' असा सवाल उपस्थित करीत गझलकार सुरेशकुमार वैराळकर यांनी बुधवारी तमाशा कलावंतांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.

'कै. पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळा'च्या वतीने देण्यात येणारा 'पठ्ठे बापूराव पुरस्कार' तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना, तर 'कै. बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार' सुरेशकुमार वैराळकर यांना खासदार श्रीनिवास पाटील आणि माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी वैराळकर बोलत होते. याप्रसंगी 'डॉ. भास्करराव खांडगे पुरस्कार' लावणी कलाकार पुष्पा सातारकर यांना प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानचे संस्थापक जयप्रकाश वाघमारे उपस्थित होते.

रघुवीर खेडकर यांना श्रीनिवास पाटील आणि उल्हास पवार यांच्या हस्ते बुधवारी 'पठ्ठे बापूराव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. या वेळी पुरस्कारार्थींसमवेत मान्यवर.

कोरोना काळातील संघर्षाकडे कोणी लक्ष दिले नाही

वैराळकर म्हणाले, 'कोरोनामुळे कलावंतांसह फडमालकांचेही हाल झाले आहे. त्यांना मदत मिळालेली नाही, म्हणूनच आता राज्यभरातील ढोलकीच्या तमाशा फडांना एकच परवाना असायला हवा. यामुळे काम सुरू असताना कोणी अडवणूक करणार नाही. या फडांची आणि कलावंंताची कायमस्वरूपी नोंदणी व्हावी. तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी राज्यात वेगळे वसतिगृह उभारण्यात यावे.' कलावंतांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

या आवाहनाला साद देत सातार्‍याचे खासदार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी तमाशा कलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. श्रीनिवास पाटील म्हणाले, 'तमाशा कलावंतांनी आपल्या समस्या लिहून काढाव्यात, मी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करेन. मतदारयादीत त्यांचे नाव घालण्यासह रेशनकार्ड मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करणार आहे. शासनदरबारी प्रश्न त्यांचे प्रश्न मांडेन.'

तमाशाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला

रघुवीर खेडकर म्हणाले, 'आज तमाशाचे आधुनिकीकरण झाले आहे. परंतु असे असले तरी आजही रंगमंचावर पठ्ठे बापूराव यांची गण आणि गवळण गायिली जाते, हेच महत्त्वाचे आहे. आम्ही कोरोनाकाळात खूप वाईट दिवस काढले. सरकारपुढे टाहो फोडत होतो. विनवण्या केल्या तरी कोणी साद दिली नाही. कारण अजूनही तमाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नाही. मी या क्षेत्रात 40 वर्षांपासून काम करत आहे. मी हे अनुभवले आहे आणि आता जगत आहे. म्हणूनच लोककलावंतांना मदत करा. जनतेने तमाशा कलावंतांना जवळ करावे.' पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे लावणी महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात लावणी कलाकारांनी ठसकेबाज लावण्या सादर करून रसिकांची मने जिंकली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT