पुणे

पुणे : चौपाटी आराखड्यास मान्यता; सारसबागलगतचे फूड कोर्ट, वॉकिंग प्लाझाचा मार्ग मोकळा

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सारसबाग चौपाटीचे रुपडे बदलण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, चौपाटीचा सुधारित आराखड्यास अंतिम मान्यता देण्यात आली आहे. या मंजुरीमुळे येथील फूड कोर्ट व लॉकिंग प्लाझा साकारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ऐतिहासिक सारसरबाग पुण्यातील आणि पुण्याबाहेरील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. येथील खाद्यपदार्थांच्या चौपाटी बागेत येणार्‍या आबालवृद्धांसह अस्सल खवय्यांना कायमच खुनावते. त्यामुळे या परिसरात पार्किंग आणि अतिक्रमणांचा प्रश्न वारंवार उद्भवतो. दुसरीकडे व्यावसायिकांनी महापालिकेची परवानगी न घेताच दुकाने दुमजली केली आहेत. त्यामुळे येथील स्टॉलवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अनेकवेळा कारवाई केली जाते.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने चौपाटीच्या नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा आराखडा एका संस्थेने तयार केला असून, त्याला प्रशासनाने मान्यता दिली आहे. आराखड्यानुसार खाद्यपदार्थांचे स्टॉल्स व वॉकिंग प्लाझामधील नागरिकांना विनाअडथळा सारसबागेचे दृश्य पाहता येईल.

सारसबाग येथील वॉकिंग प्लाझाचा आराखडा अंतिम करण्यात आला आहे. त्याला मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी लवकरच निविदा मागविल्या जातील.

                                                         – रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त.

असा आहे प्लॅन
सणस मैदानाच्या बाजूस 8 बाय 8 फुटांचे 56 स्टॉल असतील.
स्टॉलच्या पाठीमागील बाजूस 5.5 फूट मोकळी जागा असेल.
दर 8 स्टॉलनंतर पाठीमागे जाण्यास 4 फूट जागा असेल.
स्टॉलच्यासमोर टेबल – खुर्च्यांसाठी 18 फूट मोकळी जागा असेल.
पुढे 6 फूट अंतरावर शोभिवंत झाडे व कट्टे, वॉकिंग प्लाझा.
20 फूट रुंदीचा मुख्य रस्ता
पुढे शोभिवंत झाडे व बसण्यासाठी कट्टे.
त्यानंतर सारसबागेच्या बाजूस 17 फूट रुंदीचा पादचारी मार्ग
येथे येणार्‍यांच्या गाड्यांसाठी पेशवे पार्कमधील पार्किंग तीन मजली करण्याचे नियोजन आहे.

SCROLL FOR NEXT