Pune News: निवडणूक आयोगाकडून पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघांसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. एकूण 10 निरीक्षकांना या मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, संपूर्ण जिल्ह्यासाठी एका आयपीएस अधिकार्याची पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व निरीक्षकांनी आपापल्या मतदारसंघांचा आढावा घेतला.
भारतीय प्रशासन सेवेतील 2011 च्या तुकडीचे अधिकारी पिगे लिगू यांना जुन्नर व आंबेगाव मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. 2012 च्या तुकडीच्या अधिकारी अरुंधती सरकार यांना खेड-आळंदी व शिरूर, एम. गौतमी (2014) यांच्याकडे दौंड व इंदापूर, नाझिम झई खान (2013) यांना बारामती व पुंरदर, गार्गी जैन यांच्याकडे भोर व मावळ, मनवेश सिंग सिद्धू यांच्याकडे चिंचवड, पिंपरी तर ललित कुमार (2008) यांच्याकडे भोसरी व वडगाव शेरी मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे.
तसेच, के. हेमवती (2013) यांच्याकडे शिवाजीनगर व कोथरूड, संजीव कुमार (2012) यांच्याकडे खडकवासला व पर्वती, तर हडपसर, पुणे कॅन्टोनमेंट व कसबा पेठ विधानसभा मतदारसंघांसाठी भीम सिंह यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय पोलिस सेवेतील 2008 च्या तुकडीचे अधिकारी राजेश सिंह यांना संपूर्ण जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेच्या निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.