Pune News: लेक लाडकी योजनेला पुणे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत पाच हजार 400 इतके अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. या मुलींच्या बँक खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. मुलींच्या 18 वर्षांपर्यंत टप्प्या-टप्प्याने रक्कम जमा करण्यात येणार आहे. योजनेंतर्गत मुलींच्या जन्मापासून ते 18 वर्षे होईपर्यंत मुलींना एक लाख एक हजार रुपयांची रक्कम खात्यात वर्ग केली जाणार आहे.
एप्रिलमध्ये राज्य सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली. महिला व बालकल्याण विभागाने मुलींच्या जन्माचे स्वागत करावे, त्यांच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे, यासाठी लेक लाडकी योजना सुरू केली आहे. या योजनेला लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीमुळे ब्रेक मिळाला.
मात्र, आत्तापर्यंत जिल्ह्यातून 7 हजार 392 इतके अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी 5400 इतके अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. त्या मंजूर अर्जदार मुलींच्या बँक खात्यात जन्मलेल्यानंतरचा पहिला पाच हजार रुपयांचा हप्ता वर्ग करण्यात आला आहे. उर्वरित 1992 अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. काही अर्जांमध्ये त्रुटी असून, त्यातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना संबंधित अर्जदारांना करण्यात आल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
मुलगी जन्मताच पाच हजार रुपये रकमेचा पहिला हप्ता दिला जाईल. त्यानंतर पहिलीत सहा हजार रुपयांचा दुसरा हप्ता, सहावीत सात हजार रुपये, अकरावीमध्ये आठ हजार रुपये आणि 18 वर्षे पूर्ण होताच 75 हजार रुपयांचा शेवटचा हप्ता दिला जाणार आहे.
...या आहेत अटी
या योजनेत सहभागी होण्यासाठी कुटुंबीयांचे एक लाखाचे उत्पन्न असावे, भविष्यात दोन अपत्यांवर प्रतिबंध केलेले असावे, तसेच अधिवास असल्याचा दाखला आणि मुलीसह संयुक्त पासबुक असावे, अशा योजनेच्या अटी आहेत.
मुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण वाढावे, मुलींच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे तसेच मुली शिकल्या पाहिजेत, यासाठी राज्य सरकारने ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली आहे. 5400 अर्ज मंजूर केले आहेत. त्यानुसार मंजूर अर्ज केलेल्या मुलींच्या खात्यात पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता वर्ग केला आहे.- जामसिंग गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण