पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक सामाईक पात्रता परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून, येत्या 3 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. 18 ते 20 मार्चदरम्यान पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी, तर 4 एप्रिलला पदवी प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केले आहे.
पुण्यातील विद्यापीठाच्या मुख्य संकुलासह नाशिक येथील उपकेंद्रातील अभ्यासक्रमांचाही या प्रवेश परीक्षेत सहभाग आहे. पुणे विद्यापीठात 52 विभाग असून, दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येतात. नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यासह संपूर्ण देशभरातून विद्यार्थी विद्यापीठातील विभागांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करतात.
पारंपरिक अभ्यासक्रमांसह व्होकेशनल, तांत्रिक, व्यवस्थापन, ललित कला, उपयोजित विज्ञानातील अनेक अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. पूर्वी पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ओळखले जाणारे विद्यापीठ आता पदवी अभ्यासक्रमांबरोबरच सर्वसमावेशक पदवीचे केंद्र बनत आहे. त्यामुळे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही विद्यापीठातील काही अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविता येणार आहे.
पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलेली असावी, तर पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान आवश्यक गुणांसह पदवीधर पदवी धारण केलेली असावी, असे पात्रतेचे निकष आहेत. ही प्रवेश परीक्षा 100 गुणांची असून, 20 गुण हे सामान्यज्ञानावर असतात, तर 80 गुणांची संबंधित विषयाची परीक्षा असते. या परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असून, ही प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासंबंधीची अधिक माहिती देण्यात आली आहे.
प्रवेश परीक्षेचे स्वरूप
20 गुणांचा सामान्यज्ञान व
अभियोग्यतेचा पेपर, तर 80 गुणांचा मुख्य विषयाचा पेपर असेल
चुकीच्या प्रश्नाला एकचतुर्थांश गुण वजा होणार
दोन तासांची ऑनलाइन प्रवेश परीक्षा