पुणे

पुणे : आणखी 62 लाख रुपयांचे एलएसडी अमली पदार्थ जप्त

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : फूड डिलेव्हरी अ‍ॅपद्वारे एलएसडी स्टॅम्प या अमली पदार्थाची विक्री करणार्‍या टोळीतील मुख्य आरोपी ओंकार रमेश पाटील याच्याकडून आणखी 62 लाख 70 हजार रुपये किंमतीचे 24 ग्रॅम 986 मिलीग्रॅम वजनाचे एलएसडी अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्याने हे अमली पदार्थ राहत्या घराच्या परिसरातील त्याच्या मोपेड गाडीच्या डिक्कीत लपवून ठेवले होते.
याप्रकरणी पाटील याच्यासह पाच जणांना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे.

त्यांच्याकडून एकूण 1 कोटी 14 लाख 30 हजार रुपये किंमतीचा अमली पदार्थ साठा जप्त केला आहे. हे सर्व आरोपी उच्चशिक्षित असून, पार्ट्या आणि महागडे शौक पूर्ण करण्यासाठी अमली पदार्थाची विक्री करत होते. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी फूड डिलेव्हरी अ‍ॅपच्या माध्यमातून कुरिअर पाठविण्याच्या बहाण्याने अमली पदार्थ पाठवत होते. कॉलेज तरुण-तरुणींना व्हॉट्स्अ‍ॅपद्वारे संपर्क साधत होते.

याप्रकरणी, पाच जणांच्या विरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी पथकाने गुन्हा दाखल केला आहे. पाटील याला रिमांड कालावधीत विश्वासात घेऊन तपास केला असताना, त्याने ही माहिती दिली. अद्याप या पाच जणांना अमली पदार्थ पुरविणारा फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, कर्मचारी विशाल शिंदे, योगेश मोहिते, मारुती पारधी, मनोजकुमार साळुंके,पांडुरंग पवार, विशाल दळवी, संदीप शिर्के यांच्या पथकाने कारवाई केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT