वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: सिंहगड भागात पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ सुरू झाला आहे. डोणजे (ता. हवेली) येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक बैल गंभीर जखमी झाला. त्यामुळे शेतकर्यांसह रहिवाशांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वनविभागाने बिबट्याचा शोध सुरू केला आहे. डोणजे येथील शेतकरी संदीप नानासाहेब पारगे यांनी सकाळी नेहमीप्रमाणे जनावरे चारण्यासाठी रानात सोडली होती. डोणजे गावच्या पूर्वेस असलेल्या रानात जनावरे चरत असताना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने जनावरांवर हल्ला केला.
त्यावेळी इतर जनावरे दूर पळाली. एक बैल बिबट्याच्या तावडीत सापडला. बैलाच्या पाठीवर व मानेवर खोल जखमा झाल्या आहेत.
वनविभागाच्या वनपरिमंडल अधिकारी वैशाली हाडवळे म्हणाल्या, डोणजे येथील घटनास्थळी वनरक्षकांना पाठवले आहे. बिबट्याच्या अथवा हिंस्र वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात बैल जखमी झाला असावा. त्याबाबत शोध सुरू आहे. दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष बाजीराव पारगे म्हणाले, गेल्या दोन महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचा वावर सुरू आहे. वनविभागाने कायमस्वरूपी गस्त सुरू करावी.