वडगाव मावळ : पुणे जिल्हा नियोजन समितीच्या नवनियुक्त पदाधिकार्यांमध्ये मावळ तालुक्यातील माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे यांचा समावेश असल्याने मावळ तालुक्याला पुन्हा दोन जणांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीचे पदाधिकारी बरखास्त करण्यात आले होते. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने नुकतीच नवीन पदाधिकार्यांची नियुक्ती केली असून, यामध्ये भाजप व बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातील आजी, माजी खासदार, आमदार व नेत्यांना संधी देण्यात आली आहे.
यामध्ये मावळ तालुक्यातील माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे यांचा समावेश आहे. यापूर्वी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव शिंदे व शिवसेनेचे शरद हुलावळे हे समितीचे सदस्य होते. त्याआधी भाजप-शिवसेना युतीची सत्ता असताना माजी राज्यमंत्री भेगडे व जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे हे सदस्य म्हणून कार्यरत होते.