पुणे: जमिनीची सरकारी मोजणी करण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयातून 25 लाखांची लाच मागणार्या हेलिकॉप्टर शॉर्ट लावू, अशी धमकी देणारे हवेली तालुक्याचे निलंबित उपअधीक्षक अमरसिंह पाटील यांच्यावर चुकीच्या मोजणीच्या नकाशात फेरबदल करून, बनावटीकरण करून प्रत्यक्ष जागेवर मोजणी न करता मोजणी कार्यालयात बसून जागेची क प्रत दिल्याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा शनिवारी दाखल झाला आहे.
याबरोबरच भूकरमापक विरेंद्र कोकरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे हवेली मोजणी कार्यालयात खळबळ उडाली आहे.याबाबतची तक्रार येरवडा पोलिस ठाण्यात स्वप्निल अशोक भोरडे यांनी दिली होती. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Pune News)
याबाबतची माहिती अशी, गाव मौजे पिंपरी सांडस (ता. हवेली) येथील गट नंबर 427 च्या अतितातडी, हद्द कायम जमिनीची सरकारी मोजणी मो. र. नं. 12025 ही मोजणी भूकरमापक दिलीप तरटे यांच्याकडे 6 जून 2024 रोजी असताना मोजणीलगतधारक शेतकरी यांना कुठल्याही नोटिसा बजावण्यात आलेल्या नाहीत.
असे असताना कोकरे यांनी ही मोजणी 6/06/2024 ऐवजी 3/04/2024 रोजी प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजणी न करता मोजणी कार्यालयात बसून करून दिली. आणि 5/04/2024 रोजी त्याची तत्काळ ’क’ प्रत देऊन टाकल्याचे त्यांच्या आवक-जावक नोंदणी रजिस्टरमध्ये तसे नमूद केले आहे. संबंधित मोजणी कोकरेकडे नसताना देखील त्याने मोजणी केलेली आहे. मोजणी तारखेच्या अगोदर मोजण्या करून तीन ते चार दिवसांत सर्वात जलदगतीने ‘क’ प्रती देऊन टाकण्याचा पराक्रम कोकरे यांनी केलेला आहे.
हवेलीच्या मोजणी कार्यालयातील ऑनलाइन आणि ऑफलाइनमध्ये मुख्यालय सहाय्यक म्हणून विजय साबळे यांनी स्वप्निल भोरडे यांचा हरकत अर्ज लपवून ठेवला होता, तेव्हा भोरडे यांनी त्याच्या खोलात जाऊन हे प्रकरण उघडकीस आणले आहे.
हे करण्यासाठी त्यांना विजय साबळे, राहुल पेंबरे, अमरसिंह पाटील अशा अनेक मोजणी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे.दरम्यान, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे करत आहेत.