पुणे : राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी 2024-25 मध्ये वार्षिक परीक्षा व संकलित चाचणी- 2 चे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या 8 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत, असे परिपत्रक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखाराव यांनी केले आहे. तसेच, राज्यातील सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा या एकाच वेळी घेण्यात याव्यात, अशा सूचना शिक्षण उपसंचालक (प्रशासन) रजनी रावडे यांनी दिल्या आहेत.
राज्यातील शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 9 वी वर्गाच्या परीक्षा साधारणपणे मार्चअखेरीस किंवा एप्रिल महिन्यामध्ये शाळास्तरावरून घेण्यात येतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीसच वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरू असल्या, तरी विद्यार्थी उपस्थिती पुरेशी असत नाही. अशा पद्धतीने परीक्षांचे आयोजन वर्षअखेर करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होतो तसेच प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी व उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी व्हावा, यासाठी राज्यातील शाळांमध्ये वर्षअखेरीस घेण्यात येणारे मूल्यमापन एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात करण्याचे विचाराधीन आहे. राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी-1 व संकलित मूल्यमापन चाचणी-2 अशा तीन चाचण्यांचे आयाजन करण्यात येणार आहे.
परीक्षांचे आयोजन शाळास्तरावरून करण्यात येईल. परंतु, त्यासाठी प्रसिध्द केलेल्या वेळापत्रकाचाच वापर करण्यात यावा.
शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खासगी अनुदानित शाळांना तिसरी ते नववीसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांसाठी संकलित मूल्यमापन-2 च्या प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयाकडून पुरविण्यात येतील. इतर व्यवस्थापनाच्या शाळांना सर्व प्रश्नपत्रिका शाळास्तरावर तयार करावयाच्या आहेत.
इयत्ता 1 ली व 2 रीसाठी सर्व विषयांच्या व इ. 3 री ते 9 वी अन्य विषयांच्या लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळास्तरावर विकसित करून प्रचलित पद्धतीनुसार मूल्यमापन करावे.
वेळापत्रकात नमूद न केलेल्या (कला शिक्षण, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण इत्यादी) श्रेणी विषयांच्या मूल्यमापनाचे नियोजन शाळास्तरावर करण्यात यावे.
पाचवी व आठवीमधील विद्यार्थ्यांना प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांसाठी दोन प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागतील. त्यानुसार नियोजन करावे. इयत्ता पाचवी व आठवी वगळता अन्य इयत्तांकरिता कोणत्याही विषयांची दुबार परीक्षा होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
शाळेच्या स्थानिक वेळेनुसार (सकाळ सत्र/दुपार सत्र) परीक्षेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य शाळांना राहील.
तोंडी/प्रात्यक्षिक परीक्षा त्या-त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर घेण्यात यावी. विद्यार्थिसंख्या जास्त असेल तर दुसर्या दिवशी अथवा उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.
संकलित चाचणी-2 च्या कालावधीत शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील, याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी त्या विषयाच्या परीक्षेच्या दिवशी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी.
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांचा निकाल महाराष्ट्र दिन ध्वजारोहनानंतर (दि. 1) मे रोजी जाहीर करण्यात यावा. याचबरोबर 2 मे 2025 पासून सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी सुरू होईल.