पिरंगुट: काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनीशेजारीच असलेल्या भुकूम गावामध्ये स्काय मानस लेक सिटी येथील एका सोसायटीमध्ये पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्यामुळे मुळशी तालुक्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर पौड येथे मंदिरात देवीच्या मूर्तीची विटंबना झाली. त्यामुळे संतप्त मुळशीकरांनी परप्रांतीयांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. बेकायदेशीरपणे वास्तव्य करणार्या परप्रांतीयांना हाकलून देण्याची मागणी मुळशीकरांनी केली आहे.
गेल्या काही वर्षांत पिरंगुट, भूगाव, भुकूम येथे मोठ्या संख्येने फळ-भाजी विक्रेते, भंगारवाले, चिकन सेंटरवर काम करणारे परप्रांतीय वास्तव्यास आहेत. मात्र, हे सर्वजण बेकायदेशीरपणे स्थानिकांकडे भाड्याने राहत आहेत.
कोणताच करारनामा न करता अनेक जण खुलेआमपणे वावरत आहेत. त्यामुळे स्थानिक कोण आणि बाहेरचा कोण? हे समजणे अशक्य झाले आहे. भविष्यात कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नुकत्याच पौड येथे घडलेल्या देवीच्या विटंबनेच्या घटनेनंतर पोलिस, ग्रामपंचायत प्रशासन, व्यापारी संघटना तसेच सर्वसामान्य मुळशीकर अलर्ट मोडवर आले आहेत. बाहेरील नागरिकांची सध्या कसून चौकशी केली जात आहे.
आंबे विक्रीच्या बहाण्याने तालुक्यामध्ये अनेक बांगलादेशी रोहिंगे आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याबाबत पोलिस तसेच तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. स्थानिकांनी परप्रांतीय भाडेकरूंची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पौड व बावधन पोलिसांनी केले आहे.